घरकुलाचा धनादेश देण्यासाठी लाच मागणारे तिघे एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 10:31 AM2021-06-23T10:31:24+5:302021-06-23T10:31:30+5:30
Crime News : अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांनाही मंगळवारी रात्री उशीरा अटक केली.
अकोला : खडकी टाकळी येथील एका शेतमजुराचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतचे मंजूर घरकुलाचे जिओ टॅगिंग करून तिसऱ्या हप्त्याचा धनादेश काढण्यासाठी कंत्राटी अभियंता, उपसरपंच व रोजगार सेवक यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांनाही मंगळवारी रात्री उशीरा अटक केली. यासह पंचायत समितीमधील घरकुल विभागात कार्यरत असलेल्या लिपिकाचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
खडकी टाकळी येथील एका शेतमजुराला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. या मजुराने बांधकामही सुरू केले असून घराचे जिओ टॅगिंग करून तिसऱ्या हप्त्याचा धनादेश देण्याची विनंती या शेतमजूराने खडकी टाकळी येथील उपसरपंच दिलीप दौलत सदांशिव वय ५२ वर्ष, अमित देवराज शिरसाट वय २६ वर्ष कंत्राटी अभियंता ग्रामीण गृहनिर्माण, राहणार आगर, सुधीर मनतकार वय ३५ वर्ष लिपिक पंचायत समिती घरकुल विभाग अकोला व योगेश अरुण शिरसाट वय २९ वर्ष रोजगार सेवक राहणार अमानतपुर यांनी वेगवेगळ्या प्रकारे ५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारकर्त्यास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचांसमक्ष २१ जून रोजी पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आगर येथील कंत्राटी अभियंता याच्या निवासस्थानी दोन हजार पाचशे रुपयांची लाच घेताना यामधील उपसरपंच दिलीप सदांशिव, कंत्राटी अभियंता अमित शिरसाट व रोजगार सेवक योगेश शिरसाट या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सुधीर मनतकार याचाही आरोपींमध्ये समावेश करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई एसीबीचे प्रमुख शरद मेमाने, अनवर खान, संतोष दहिहंडे, अभय बावस्कर यांनी केली.