'त्या' आएएएस अधिकाऱ्यासह दहा जणांच्या घरांवर एसीबीचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:21 AM2021-03-04T05:21:17+5:302021-03-04T05:21:29+5:30
टीएमटी घोटाळा प्रकरणी तत्कालीन परिवहन व्यवस्थापक करंजकर यांच्या ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील गिरिजा नीळकंठ हाइटस् येथील २११ क्रमांकाच्या सदनिकेत २ मार्च रोजी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या आधिपत्याखालील ११ पथकांनी ही शोधमोहीम राबविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) ४७० प्रवासी बसथांब्यांच्या जागी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर प्रवासी निवारे बांधून त्यावर जाहिरात प्रदर्शित करण्याच्या ठेक्यांमध्ये केलेल्या सहा कोटी ७३ लाखांच्या घोटाळ्यामध्ये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर मंगळवारी त्यातील सनदी अधिकारी अशोक करंजकर यांच्यासह दहा जणांच्या घरात झडती घेतली.
तत्कालीन परिवहन व्यवस्थापक करंजकर यांच्या ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन येथील गिरिजा नीळकंठ हाइटस् येथील २११ क्रमांकाच्या सदनिकेत २ मार्च रोजी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या आधिपत्याखालील ११ पथकांनी ही शोधमोहीम राबविली. करंजकर यांच्याशिवाय तत्कालीन परिवहन व्यवस्थापक श्रीकांत सरमोकदम यांच्या खोपट येथील निवासस्थानी, तत्कालीन परिवहन उपव्यवस्थापक कमलाकर दीक्षित यांच्या लुईसवाडीतील मैत्री टॉवरमध्ये, मुख्य लेखापाल (सेवानिवृत्त) अजित निऱ्हाळे यांच्या पाचपाखाडीतील श्रीजी व्हिला, तसेच बडतर्फ अधिकारी गुरुनाथ पेडणेकर यांच्या नवी मुंबईतील नेरूळ येथील घरातही ही छापेमारी झाली. याशिवाय, तत्कालीन वाहतूक निरीक्षक दिलीप कानडे, तसेच पिटर पिंटो आणि सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत धुमाळ आदी आठ अधिकाऱ्यांच्या घरी ही छापेमारी झाली.
n२००८ ते २०१८ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये ठाणे परिवहन सेवेतील तत्कालीन व्यवस्थापक करंजकर यांच्यासह आठ अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा आणि पदाचा दुरुपयोग करून जाहिरात प्रदर्शनाचे हक्क
देण्याबाबतचा ठेका मिळण्यासाठी टीएमटीकडून घेतलेल्या निविदा प्रक्रियेत कोरोडोंचा घोटाळा केल्याप्रकरणी एसीबीने श्रीनगर पोलीस ठाण्यात १ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल केला आहे.