22 लाखांची रोकड, 4 कार, सोन्याचे दागिने; फक्त 12 हजार पगार अन् घरी सापडलं 6 कोटींचं घबाड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 01:04 PM2022-12-07T13:04:24+5:302022-12-07T13:09:45+5:30
दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, चार आलिशान कार, एक बीएमडब्ल्यू कारसह मोठ्या प्रमाणात इतर मालमत्तेची माहिती मिळाली आहे.
राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागातील माहिती सहाय्यकाचे सुरुवातीचे मासिक वेतन 12 हजार रुपये आहे. विभागात कायमस्वरूपी झाल्यावर दरमहा 32 हजार रुपये इतका पगार मिळणे सुरू होते. यावरून एखाद्या माहिती सहाय्यक कर्मचाऱ्याकडे किती मालमत्ता असू शकते याचा अंदाज लावू शकतो. ही मालमत्ता एकतर 5 लाख, 10 लाख किंवा 20 लाख असू शकते. पण जेव्हा भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या (एसीबी) पथकाला राजस्थानच्या एका महिला कर्मचाऱ्याच्या मालमत्तेची माहिती मिळाली तेव्हा पथकाचे अधिकारीही हैराण झाले.
बेहिशोबी मालमत्तेची माहिती मिळताच एसीबीच्या पथकाने प्रतिभा कमल यांच्या जागेवर छापा टाकून झडती घेतली. या छाप्यात पथकाला एकूण साडे सहा कोटींची संपत्ती आढळली. हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एसीबीचे डीजी भगवान लाल सोनी यांनी या छाप्याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रतिभा कमल यांच्या दोन ठिकाणांवर बेहिशोबी मालमत्तेच्या तक्रारी आल्याने छापे टाकण्यात आले. छाप्यादरम्यान त्याच्या जयपूर येथील राहत्या घरातून 22 लाख 90 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
दीड किलो सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी, चार आलिशान कार, एक बीएमडब्ल्यू कार, एक बीएमडब्ल्यू मोटारसायकलसह मोठ्या प्रमाणात इतर मालमत्तेची माहिती मिळाली आहे. प्रतिभा कमल आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे 11 बँक खाती असल्याची माहिती मिळाली असून, त्याबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. 12 विमा पॉलिसींची कागदपत्रे सापडली आहेत. यासोबतच 7 दुकाने आणि 13 निवासी आणि व्यावसायिक भूखंडांची कागदपत्रेही सापडली आहेत. एडीजी दिनेश एमएन यांच्या निर्देशानुसार एसीबीचे अतिरिक्त एसपी पुष्पेंद्र सिंह राठोड आणि त्यांची टीम ही संपूर्ण कारवाई करत आहे.
मंगळवारी सकाळी एसीबीच्या पथकाने माहिती सहाय्यक प्रतिभा कमल यांच्या घरावर आणि कार्यालयावर अचानक छापा टाकला. दुपारपर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सापडलेल्या मालमत्तेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. प्रतिभा कमल यांच्या मालमत्तेची बातमी सोशल मीडियावर येताच सर्व कर्मचारी चक्रावले. प्रतिभा कमल यांच्या संपत्तीची माहिती असल्याने मंगळवारी डीओआयटी कार्यालयात दिवसभर याचीच चर्चा सुरू होती. एबीसीची टीम आता बँक खात्यांची चौकशी करणार आहे. खात्यांमध्ये आणखी पैसे असण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"