पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यासह दोन ठेका कर्मचाऱ्यांवर एसीबीने लाच घेताना केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 09:37 PM2019-09-16T21:37:52+5:302019-09-16T21:39:35+5:30
वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा - ठाणे येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून वसई विरार महानगरपालिकेच्या एफ प्रभाग समितीच्या एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन ठेका कर्मचाऱ्यांना 15 हजारांची लाच घेताना रंगेहात सोमवारी दुपारी पकडले आहे. या घटनेने संपूर्ण महानगरपालिकेच्या विभागांमध्ये खळबळ माजली आहे. वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या एफ प्रभाग समिती कार्यालयात योगेश रविकांत सावंत (49) हे अतिक्रमण विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असून गोरख सदगीर (29) आणि नारायण अंकुश देसाई (28) हे ठेका कर्मचारी त्यांच्यासोबत जोडीला काम करत होते. नवजीवन येथील राहते घराच्यावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 30 वर्षीय पीडित तक्रादाराकडून कारवाई करू नये म्हणून योगेश आणि गोरख यांनी 25 हजारांची लाचेची मागणी केली होती. पण तडजोडी अंती 15 हजार रुपयांवर मान्य झाले होते. सोमवारी सकाळी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी वालीव प्रभागातील नवजीवन येथील बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी दोघांच्या वतीने नारायण याला 15 हजार रुपये रोख रक्कम स्विकारताना सोमवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास ठाणे येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकारी पोलीस उपअधीक्षक कुळकर्णी, कर्मचारी पोलीस नाईक गोसावी, पोलिस नाईक पवार, महिला पोलिस नाईक जोंधळे, पोलिस शिपाई पवार, पोलीस शिपाई त्रिभुवन या पथकाने सापळा रचून पकडले आहे.