अरे देवा! एसीबी टीम दारावर होती अन् तहसीलदार गॅस शेगडीवर १५ लाखांच्या नोटा जाळत होता!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:28 AM2021-03-25T11:28:52+5:302021-03-25T11:35:47+5:30
इथे सरकारी जमिनीचं टेंडर पास करण्यासाठी तहसीलदारने ठेकेदाराकडून ५ लाख रूपये लाच मागितली होती. डील ठरल्यावर राजस्व निरिक्षक एक लाख रूपयांची रक्कम घेण्यासाठी गेला होता.
राजस्थानमध्ये अॅंटी करप्शन ब्यूरोने भ्रष्टाचाऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. तेच भ्रष्टाचारी लोक वाचण्यासाठी नवनवीन आयडिया काढत आहेत. याचंच एक उदाहरण बुधवारी बघायला मिळालं. सिरोह जिल्ह्यातील पिंडवाडा तहसीलमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली. इथे सरकारी जमिनीचं टेंडर पास करण्यासाठी तहसीलदारने ठेकेदाराकडून ५ लाख रूपये लाच मागितली होती. डील ठरल्यावर राजस्व निरिक्षक एक लाख रूपयांची रक्कम घेण्यासाठी गेला होता. ज्याला पाली एसीबीने रंगेहाथ पकडलं.
एसीबी टीम आवाज देत राहिली, तो नोटा जाळत राहिला
मीडिया रिपोर्टनुसार, या घटनाक्रमात आर आयला सायंकाळी ३ ते ४ वाजता एसीबी टीमने पकडलं. यानंतर त्याला सोबत घेऊन पिंडवाडा तहसीलदार कार्यलयात पोहोचले. पण यादरम्यान तहसीलदाराला कुणाच्या तरी माध्यमातून एसीबीच्या कारवाईची खबर लागली होती. अशात तो त्याच्या सरकारी घरात घुसला. यावर एसीबी आणि स्थानिक पोलिसांनी १ तास मेहनत घेतली. तहसीलदाराला आवाज दिले, पण तो काही बाहेर आला नाही. मग एसीबी टीमला दरवाजा तोडावा लागला. जेव्हा दरवाजा तोडून टीम आत गेली तर सर्वजण हैराण झाले.
जळालेल्या नोटा ताब्यात
एसीबी टीम आत येताच तहसीलदार कल्पेश जैन गॅस शेगडीवर नोटा जाळताना आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत तहसीलदाराने तब्बल १५ लाख रूपये इतकी रक्कम गॅस शेगडीवर जाळून राख केली. यानंतर एसीबी टीमने घरात घुसल्यावर आग विझवली. सोबतच जळालेल्या नोटा ताब्यात घेतल्या. आरआय आणि तहसीलदाराला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.