Accident Help: अपघातातील जखमींना मदत करा, ५००० रुपयांचे बक्षीस मिळवा; केंद्राची योजना माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 12:27 PM2022-01-23T12:27:54+5:302022-01-23T12:28:35+5:30
Accident Help Reward: अपघात झाल्यानंतर जो जखमींना मदत करेल त्याला पुढचा चौकशी, पोलिसांचा त्रास मोठा होत होता. यामुळे कोणी मदत करण्यास पुढे येत नव्हते.
देशात रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी लोक गंभीर जखमी होतात. प्रत्येकवेळी या जखमींना वेळेत उपचार मिळतात असे नाही, अनेकांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू होतो. अपघात झाल्यानंतर जो जखमींना मदत करेल त्याला पुढचा चौकशी, पोलिसांचा त्रास मोठा होत होता. यामुळे कोणी मदत करण्यास पुढे येत नव्हते. ही त्रुटी दूर करत मदत करणाऱ्यांना अभय देण्य़ात आले होते. तसेच त्यांना ५००० रुपयांचे बक्षीसही दिले जाणार आहे.
नोएडाचे डीएसपी (वाहतूक) गणेश प्रसाद यांनी सांगितले की, रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या, मदत करणाऱ्या व्यक्तींना ५००० रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. गेल्या ५ वर्षांत ४६००० अपघातांत २००० हून अधिक मृत्यू झाले आहेत.
खूप प्रयत्न करूनही लोक पोलिसी कारवाईमुळे रस्ते अपघातातील जखमींना मदत करण्यास घाबरत आहेत. जर एखाद्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचविले तर त्याचे प्राण वाचू शकतात. लोकांनी पोलिसांची चिंता करू नये, अशी मदत करणारा कोणीही चांगला व्यक्ती गुन्ह्यासाठी त्रस्त होणार नाही. त्याला जखमीला अॅडमीट केल्यावर लगेचच हॉस्पिटल सोडण्याची परवानगी दिली जाईल, असे प्रसाद य़ांनी सांगितले.
केंद्र सरकारने रस्ते अपघातात लोकांची मदत करणाऱ्यांना २००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यानंतर गेल्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये ही रक्कम वाढवून ५००० रुपये करण्यात आली होती. हा आदेश ३१ मे २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.