मेंढवणजवळ टँकर-टेम्पोचा भीषण अपघात; गॅस गळतीमुळे वाहतूक खोळंबली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:01 PM2022-05-19T12:01:49+5:302022-05-19T12:02:00+5:30
तीव्र उतार असल्यामुळे मेंढवण येथील उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे.
- शशिकांत ठाकूर
कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यातील मेंढवण येथे भीषण अपघात झाला आहे. गॅस टँकर समोरून येणाऱ्या टेम्पोवर आदळून पलटी झाला. यामध्ये जीवितहानी झालेली नाही.
मुंबई-अहमदाबाद वहिनीवर गॅसचा टँकर पलटी झाला आहे. मेंढवण घाटातील तीव्र उतारावर टँकर चालकाचा वाहणनावरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद वाहिनीवरील वाहतूक मंदावली आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही.
गॅस टँकरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर पुढे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोवर आदळून तो विरुद्ध दिशेला मुंबई-अहमदाबाद मार्गावर जाऊन पलटी झाला. तीव्र उतार असल्यामुळे मेंढवण येथील उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे. घटनास्थळी महामार्ग पोलीस यंत्रणादेखील दाखल झाली आहे. हा अपघात सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास झाला असून टँकरमध्ये अमोनिया गॅस असून त्याची गळती सुरू झाली आहे.