सरपंचपदाच्या निवडणुकीतील पत्नीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी घडवून आणला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:50 AM2019-03-20T00:50:00+5:302019-03-20T02:37:38+5:30
न-हे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याच्या रागातून महिला सरपंचच्या पतीला धडक देऊन अपघाताचा बनाव करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे - न-हे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाच्या निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याच्या रागातून महिला सरपंचच्या पतीला धडक देऊन अपघाताचा बनाव करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अविनाश कैलास कांबळे (वय ३९, रा़ विठ्ठल कलावती निवास, न-हे) आणि नितीश सतीश थोपटे (वय ३०, रा़ थोपटे बिल्डिंग, धायरीगाव) अशी त्यांची नावे आहेत़ ही घटना मुंबई -बंगलुरु महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडला ओमकार लॉजजवळ १३ मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली होती़ अपघातात बाळासाहेब सोपान वनशिव (वय ५२, रा़ नºहे) हे गंभीर जखमी झाले आहेत़ त्यांच्या डोक्याला मार लागला असून हातपायाला गंभीर जखमा झाल्या आहेत़ त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, बाळासाहेब वनशिव हे न-हे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी वनशिव यांचे पती आहेत़ ते व त्यांचे मित्र प्रकाश टिळेकर हे १३ मार्चला सकाळी साडेपाच वाजता नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते़ आंबेगाव खुर्द येथील सर्व्हिस रोडने ते जात असताना एक पांढऱ्या रंगाची कार दोन ते तीन वेळा त्यांच्या बाजूने फिरुन गेली होती़ व्यायाम करुन ते परत येत असताना सर्व्हिस रोडच्या कडेने ते जात होते़ तेव्हा मागून आलेल्या कारने वनशिव यांना जोरात धडक दिली व ती कार वेगाने निघून गेली़ टिळेकर व वनशिव यांच्या नातेवाईकांनी त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले़ सरपंच मिनाक्षी वनशिव यांनी अविनाश कांबळे यांच्यावर संशय व्यक्त केला होता़ या गुन्ह्णाचा तपास करीत असताना सहायक फौजदार प्रदीप गुरव व पोलीस शिपाई जगदीश खेडेकर यांना कांबळे व थोपटे हे दोघे कोळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला़ त्यांचा मित्र रोहीत पवार (रा़ नºहे गाव) याची कार घेऊन गुन्हा केल्याचे सांगितले़ ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, सहायक उपनिरीक्षक प्रदीप गुरव, हवालदार विनोद भंडलकर, गणेश सुतार, उज्वल मोकाशी, प्रणव सकपाळ, जगदीश खेडकर यांनी केली़
चिठ्ठीवर झाल्या होत्या विजयी
न-हे ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवडणूक १५ मार्च २०१८ साली झाली होती़ त्यावेळी सरपंचपदासाठी रेश्मा अविनाश कांबळे, मीनाक्षी बाळासाहेब वनशिव, अनिता देविदास कुटे असे एकूण तीन अर्ज आले मात्र अनिता कुटे यांचा अर्ज अवैध ठरल्याने रेश्मा कांबळे व मीनाक्षी वनशिव यांच्यात सरपंचपदाची लढत होती. गुप्त मतदान पद्धतीत दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी ८ -८ अशी समान मते पडली़ त्यामुळे चिठ्ठी पद्धतीने मतदान घेण्यात आले़ त्यात मिनाक्षी वनशिव यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्या सरपंच झाल्या़