२० हजारांची लाच घेताना लेखाधिकाऱ्यास अटक, आदिवासी प्रकल्प विभागातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 22:31 IST2023-05-26T22:31:06+5:302023-05-26T22:31:33+5:30
यावल शहरात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे.

२० हजारांची लाच घेताना लेखाधिकाऱ्यास अटक, आदिवासी प्रकल्प विभागातील प्रकार
- डी.बी. पाटील
यावल, जि. जळगाव : भोजन ठेक्याच्या बिल मंजुरीसाठी २० हजारांची लाच घेताना यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागातील लेखाधिकारी रवींद्र भाऊराव जोशी, (५७, रा. रा. नेहरूनगर, मोहाडी रोड, जळगाव) यास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी यावल येथे ही कारवाई केली.
यावल शहरात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात मक्तेदारामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात भोजन पुरवठा करणाऱ्या एका संस्थेचे ७३ लाखांचे बिल मंजूर झाले होते. मात्र, बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात अर्धा टक्के अर्थात ३६ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी लेखापाल रवींद्र जोशी याने केली.
यात तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत ठेकदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी जोशी याला २० हजार रुपयांची लाच घेताना यावल कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.