इचलकरंजी महावितरणच्या अभियंत्यासह लेखापाल लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:30 PM2023-10-17T22:30:59+5:302023-10-17T22:32:22+5:30

सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांच्या औद्योगिक परवाना वीज मीटरची पाहणी महावितरणच्या अधिका-यांनी करून त्या ग्राहकाने अनधिकृत वीज वापरल्याबद्दल त्याला दोषी ठरवून पाच वर्षांचा एकूण एक लाख २२ हजार ६७८ रुपये दंडाची नोटीस दिली होती.

Accountant with Ichalkaranji Mahavitaran's engineer in the net of bribery | इचलकरंजी महावितरणच्या अभियंत्यासह लेखापाल लाचलुचपतच्या जाळ्यात

इचलकरंजी महावितरणच्या अभियंत्यासह लेखापाल लाचलुचपतच्या जाळ्यात

इचलकरंजी : अनधिकृतपणे वीज वापर केल्याने झालेल्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ३६ हजार रुपयांची लाच घेताना  महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता व  सहायक लेखापाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले. ही कारवाई मंगळवारी दुपारच्या सुमारास महावितरणच्या स्टेशन रोडवरील मुख्य कार्यालयात झाली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुयोग दिनकर पाटणकर (वय ४७, रा. खासबाग मैदान, मंगळवार पेठ, कोल्हापूर. मूळ गाव सोमवार पेठ पन्हाळा, ता.पन्हाळा) व सहायक लेखापाल रवींद्र बापूसाहेब बिरनाळे (३८, रा. आमराई रोड, शिक्षक कॉलनी, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, एका वीज ग्राहकाने स्वत:च्या इमारतीमध्ये औद्योगिक परवाना वीज जोडणी करून घेतली होती. तेथील व्यवसाय बंद झाल्यानंतर त्या ग्राहकाने ती इमारत औद्योगिक परवाना वीज जोडणीसह कराराने भाड्याने दिली होती. सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांच्या औद्योगिक परवाना वीज मीटरची पाहणी महावितरणच्या अधिका-यांनी करून त्या ग्राहकाने अनधिकृत वीज वापरल्याबद्दल त्याला दोषी ठरवून पाच वर्षांचा एकूण एक लाख २२ हजार ६७८ रुपये दंडाची नोटीस दिली होती. हे प्रकरण सुंदर बागेजवळील महावितरणच्या कार्यालयांतर्गत येत असल्याने तेथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता पाटणकर आणि बिरनाळे यांनी त्या ग्राहकाला पाच वर्षाऐवजी फक्त एक वर्षाचाच दंड करण्यासाठी म्हणून दंडाची रक्कम १९ हजार आणि दोघांसाठी ४१ हजार रुपयांची लाच असे ६० हजार रुपये मागितले. त्यामध्ये तडजोडीअंती ५५ हजार रुपयांची रक्कम ठरविण्यात आली. त्यामधील १९ हजार रुपये दंडाचे वजा जाता ३६ हजार लाचेची रक्कम असे ठरविण्यात आले.

याबाबत ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यामध्ये पडताळणी केली असता दोघांनी लाच मागितल्याचे तसेच पाटणकर याने बिरनाळे याला रक्कम देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार हा व्यवहार मंगळवारी दुपारी महावितरणच्या स्टेशन रोडवरील मुख्य कार्यालयात होणार होता. तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून ही कारवाई केली. दोघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, समाजमाध्यमांवरही जोरदार टीका सुरू होती.

पाठलाग करून पकडले
ठरल्याप्रमाणे ग्राहकाकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी बिरनाळे महावितरणच्या स्टेशन रोडवरील कार्यालयात आला होता. तेथे कारवाईची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकातील कर्मचाºयांनी पाठलाग करत त्याला पकडले. या घटनेचीही चर्चा कार्यालयासह परिसरात सुरू होती.

Web Title: Accountant with Ichalkaranji Mahavitaran's engineer in the net of bribery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.