उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावरील आरोप खोटा; पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:59 AM2024-03-18T10:59:40+5:302024-03-18T11:00:11+5:30
बलात्काराची होती तक्रार, तपासात काय आढळले? वाचा सविस्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याविरोधात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यांत मुंबई पोलिसांना कोणताही पुरावा न सापडल्याने त्याचा तपास बंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी शनिवारी बी समरी अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे सादर केला आहे. एका डॉक्टर महिलेने जिंदाल यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात शनिवारी हा अहवाल पोलिसांनी सादर केला. याप्रकरणी बी समरी अहवाल दाखल झाल्याचे तक्रारदार पक्षाला कळवण्यात आले आहे. अहवालानुसार, तक्रारदार महिलेने केलेल्या आरोपांची पुष्टी करणारे पुरावे पोलिसांना प्राप्त झाले नसल्याचे नमूद आहे. जुहू परिसरात ३० वर्षीय तक्रारदार राहण्यास असून तिने न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता.
तपासात काय आढळले?
तक्रारदाराने घटनेनंतर खूप दिवसांनी तक्रार दाखल केली आहे. महिला अधिकाऱ्यामार्फत तक्रार नोंदवूनही पुरावे स्वत: सादर करणार असल्याचे सांगूनही त्यांनी अद्याप पुरावे सादर केलेले नाहीत. “तसेच, आम्ही तपास अधिकारी म्हणून सीआरपीसी १६४ नुसार पुरावे मिळविण्याच्या हेतूने आणि फिर्यादीचे म्हणणे रेकॉर्ड करण्यासाठी, वारंवार कोर्टात पत्र लिहूनही, ती फिर्यादीला माहिती देण्यासाठी जबाब नोंदवताना दिसून आली नाही. न्यायालयाचा वेळ वाया घालवला. तसेच ज्या हॉटेलमध्ये घटना घडल्याचे नमूद केले. तेथील साक्षीदाराकडे केलेल्या चौकशीत कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे समोर आले. एकूणच, तपासात खटला महिलेने आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने दाखल केला असल्याचे म्हटले.