मंगेशी देवस्थानात पुजाऱ्याविरोधात विनयभंग केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 09:54 PM2018-07-18T21:54:17+5:302018-07-18T21:54:42+5:30
समाज माध्यमात दखल; देवस्थान समितीकडून आरोपांचा इन्कार
पणजी/फोंडा - प्रसिद्ध मंगेशी देवस्थानातील पुजाऱ्याने अनुचित वर्तन केल्याचा आरोप एका तरुणीने लेखी पत्राद्वारे केला आहे. देवस्थानच्या व्यवस्थापनाने मात्र हा आरोप नाकारलेला आहे. मूळ गोमंतकीय असणारी संबंधित तरुणी सध्या अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेते. तिने देवस्थानच्या व्यवस्थापनाला 11 जुलै 2018 रोजी पत्र पाठवून 22 जून 2018 रोजी घडलेला घटनाक्रम सविस्तर सांगितलेला आहे. या विषयाची समाजमाध्यमांनीही दखल घेतलेली आहे.
मंगेशी देवस्थान परिसरात पुजारी धनंजय भावे याने आपल्याला अनुचित स्पर्श केल्याचे संबंधित भाविक तरुणीने म्हटले आहे. पत्रात ती म्हणते, या दिवशी सकाळी 8.30 वा.च्या सुमारास धार्मिक विधीसाठी माङया आई-वडिलांसह मी मंदिरात गेले होते. गाभा:यामध्ये पूजेचा विधी सुरू असताना मला मात्र या पवित्र जागेच्या बाहेर बसण्यास सांगितले होते. गाभाऱ्याच्या बाहेर विहिरीजवळ लॉकर्स आहेत. तेथे धनंजय आला आणि प्रदक्षिणा घालण्यास सांगण्याच्या बहाण्याने त्याने माङया खांद्यावर हात ठेवला तसेच मला घट्ट मिठी मारण्याचा प्रयत्न करत माङो चुंबन घेण्याचाही प्रयत्न केला. मला हा मोठा धक्का होता. त्याच्यापासून बाजूला होण्याचा मी प्रयत्न केला तरीही त्याने गालाचे चुंबन घेतले.
आईवडिलांचे धार्मिक विधी झाल्यानंतर घडल्या प्रकाराची मी त्यांना कल्पना दिली. दुपारी 12.30 वा.च्या सुमारास माङो वडील धनंजय याचे भाऊ भूषण भावे यांच्याशी बोलले आणि घडलेला प्रकार सांगितला. आम्हाला पुढील विमान प्रवास करावयाचा असल्याने आम्ही निघालो. दुसऱ्याच दिवशी 23 जूनला माङो वडील धनंजय याच्याशी बोलले. मात्र, मी केवळ खांद्यालाच स्पर्श केला आहे, असे सांगत प्रारंभी त्याने दुर्लक्ष केले. घडलेली घटना मला पूर्णत: माहीत असल्याचे वडिलांनी स्पष्ट केल्यावर, तसेच कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर तो वारंवार माफी मागू लागला. पत्रात पुढे म्हटले आहे की, कोणत्याही धार्मिक विधीवेळी, कोणत्याही कारणास्तव पुजा:याने महिलांच्या शरीराला स्पर्श करावयाचा नसतो. या घटनेसंदर्भात कायदेशीर सल्लामसलत केल्यानंतर आम्ही हे पत्र देवस्थानला लिहीत आहोत. पुजारी धनंजय याने या घटनेची कबुली दिली असून मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या घटनेचे चित्रिकरण झालेले असणार. व्यवस्थापन समितीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रिकरण पाहावे आणि चौकशी करावी.
मुलींना गाभाऱ्यात धार्मिक विधीसाठी अटकाव करणे हेदेखील कायद्याच्या विरोधात असल्याकडे संबंधित तरुणीने देवस्थानच्या व्यवस्थापन समितीचे लक्ष वेधले आहे. गाभाऱ्याच्या बाहेर मुलींना बसवले जाते आणि त्यांच्या पालकांकडून गाभाऱ्यात धार्मिक विधी केले जातात. अशावेळी बाहेरच्या मुलींशी धनंजय याने अनेक वर्षे गैरवर्तन केले असण्याची शक्यता आहे. धनंजय हा वासनांध, खोटारडा आणि विकृत मनोवृत्तीचा माणूस असून देवस्थानात पुजारी म्हणून काम करण्यास तो पात्र नाही, अशी टिप्पणी करीत व्यवस्थापन समितीने ही घटना गांभीर्याने घ्यावी आणि कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्या तरुणीने व्यक्त केली आहे.
सकृतदर्शनी पुरावा नाही
देवस्थानचे सचिव अनिल केंकरे यांनी संबंधित तरुणीच्या आरोपाचा इन्कार केला आहे. या पत्रास त्यांनी उत्तर दिलेले आहे. 4 जुलैला झालेल्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी या उत्तरात म्हटले आहे. या घटनेचा सकृतदर्शनी कोणताही पुरावा आढळला नसल्याचे केंकरे यांनी सांगितले आहे. यथोचित अधिकारिणीकडे आपण आपली तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी या तरुणीला सांगितले आहे. केंकरे यांच्याशी संपर्क साधल्यावर संबंधित तरुणीला आम्ही लेखी उत्तर दिले असून तेथेच हा विषय संपला, असे त्यांनी सांगितले.
लोकप्रिय देवस्थान
दक्षिण गोव्यातील मंगेशी देवस्थानाला देश-विदेशातून मोठय़ा संख्येने पर्यटक भेट देतात. याशिवाय स्थानिक लोकांचीही रिघ लागलेली असते. या कथित घटनेमुळे हे मंदिर चर्चेचा विषय बनले आहे.