हॉटेलमध्ये चोऱ्या करून सराईत आरोपी पसार; देवनार पोलिसांचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 06:28 PM2018-10-23T18:28:27+5:302018-10-23T21:06:22+5:30
या आरोपीने स्वतःचे बोगस ओळखपत्र बनविले असून त्या ओळखपत्रावर तो नोकरी मिळवून अशा चोऱ्या करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
मुंबई - मुंबईत अनेक हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करून काही दिवसांनी विश्वास संपादन केल्यानंतर त्या हॉटेलमध्ये चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याचा देवनार पोलीस माग काढत आहेत. या आरोपीने स्वतःचे बोगस ओळखपत्र बनविले असून त्या ओळखपत्रावर तो नोकरी मिळवून अशा चोऱ्या करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे अशी माहिती देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कदम यांनी दिली आहे.
देवनारमधील लॉजिक हॉटेलमध्ये मनसुद या नावाने वेटरची नोकरी करत होता. सुरुवातीचे दोन दिवस मनसुद चांगलं काम करत होता. त्यामुळे मालकाचाही त्याच्यावर विश्वास बसला. मनसुद हा देखील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे हॉटेलमध्ये राहू लागल्यामुळे दोन दिवसात त्याने हॉटेलबाबत सर्व माहिती करून घेतली. नंतर १९ ऑक्टोबरला मध्यरात्री हॉटेलमधील सर्व कर्मचारी झोपेत असताना मनसूदने इतर कर्मचाऱ्यांची १७ हजारांची रक्कम आणि मोबाईल लंपास करून पळ काढला. दुसऱ्या दिवशी हॉटेलचे कमर्चारी मनसुदला शोधू लागले. त्याला संपर्क करण्यासाठी मोबाईल पाहायला गेले असता कर्मचाऱ्यांचे मोबाईल देखील गायब झाले होते. चोरीचे दृश्य हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाले असून याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.