१३ वर्षांपासूनचा फरार आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:49 AM2019-03-22T00:49:27+5:302019-03-22T00:49:40+5:30
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंदी येथे तेरा वर्षांपूर्वी २००६ साली एका दाम्पत्यास मारहाण करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून नेणाऱ्या आणि तेव्हापासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.
शिक्रापूर - शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंदी येथे तेरा वर्षांपूर्वी २००६ साली एका दाम्पत्यास मारहाण करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून नेणाऱ्या आणि तेव्हापासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे. या आरोपीस शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
करंदी (ता. शिरूर) येथे ११ मार्च २००६ रोजी शिक्रापूर-चाकण रस्त्यालगत असलेल्या पेट्रोल पंपासमोर एक दाम्पत्य घरात झोपलेले असताना पाच-सहा अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत नयना ढोकले व किरण ढोकले यांना लोखंडी गजाच्या साहाय्याने मारहाण करत नयना यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम लुटून नेली होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असताना शिक्रापूर पोलिसांनी त्या वेळी पाच आरोपींना अटक करत त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला होता. परंतु त्या गुन्ह्यातील लैल्या चव्हाण हा फरार झाला होता. तो अद्यापपर्यंत फरारच होता. हा आरोपी भांबोरा या गावी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार संजय जाम, सुनील जवळे, शरद बांबळे यांनी भांबोरा येथे जात सापळा रचून लैल्या ऊर्फ लयल्या सुलाख्या चव्हाण (वय ३५ वर्षे रा. भांबोरा व जलालपूर शिवार, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. या आरोपीस शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आज शिक्रापूर पोलिसांनी आरोपीस शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.