तरुणीचा विनयभंग करून चालत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 03:13 PM2020-11-28T15:13:16+5:302020-11-28T15:15:25+5:30
Crime News : डब्यात चढलेल्या दोन तरुणांनी तरुणीचा विनयभंग केला. तरुणीने त्यांना प्रतिकार केला असता असता तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
कल्याण - आठगाव ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान चालत्या रेल्वे गाडीत एका तरुणीचा दोन जणांनी विनयभंग केला. तरुणीने प्रतिकार केला असता तिला चालत्या रेल्वे गाडीतून फेकून देण्याचा प्रयत्न या दोघांनी केला. तरुणीने प्रतिकार करून प्रसंगावधान दाखविल्याने कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकारामुळे महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
कसारा येथे राहणारी २१ वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलवर बड्या पदावर कार्यरत आहे. कामानिमित्त ती दररोड कसारा ते ठाणे दरम्यान प्रवास करते. लॉकडाऊननंतर महिला प्रवाशांकरीता विशेष रेल्वे गाडय़ा सुरु केलेल्या आहेत. ही तरुणी रेल्वेने प्रवास करते. नेहमी प्रमाणे २५ नोव्हेंबर रोजी ती ठाण्याला कामाला गेली होती. कामावरुन सुटल्यावर तिने रात्री ठाण्याहून कसारा येथे येण्याकरीता गाडी पकडली. ठाणे रेल्वे स्थानकातून गाडी सुटली तेव्हा महिला डब्यात अन्य प्रवासी महिला होत्या. त्यानंतर विविध स्थानकात महिला प्रवासी उतरल्या. आटगाव रेल्वे स्थानक येईपर्यंत महिलांचा डबा रिकामा झाला. महिला डब्यात केवळ ही तरुणीच प्रवास करीत होती.
आठगाव रेल्वे स्थानकातून गाडीने स्थानक सोडले. तेव्हा धावत्या रेल्वे गाडीत दोन जण चढले. हे दोघेही दारुच्या नशे तर्र होते. त्यांना पाहून एकटीच असलेली तरुणी प्रथम भयभीत झाली. तिने तिच्या मोबाईलवर त्या दोघांचा फोटा काढून तो तिच्या नातेवाईकांना पाठविला. त्यांना कसारा रेल्वे स्थानकात येऊन थांबण्याचा मेसेज दिला. डब्यात चढलेल्या दोन तरुणांनी त्या तरुणींचा विनयभंग केला. तरुणीने त्यांना प्रतिकार केला असता असता तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा सगळा सुरु असताना गाडीने कसारा रेल्वे स्थानक गाठले. एका तरुणाने पळ काढला तर एक जणाला कसारा रेल्वे पोलिसांच्या मदतीने तरुणीच्या नातेवाईकांनी पकडले. दुस-या आरोपीला आज कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपीची नावे अमोल जाधव व अमन हिले अशी आहेत.
कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांनी सांगितले की, तरुणीचा विनयभंग व तिला चालत्या गाडीतून फेकून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन्ही आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे महिला प्रवाशांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.महिला डब्यात अन्य कोणी महिला प्रवासी नसल्यास पुरुषांच्या डब्यातून प्रवास केला पाहिजे. सर्व ठिकाणी गस्त वाढविली आहे.