बनावट ई-पास बनविणारा आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 10:38 PM2020-05-21T22:38:44+5:302020-05-21T22:39:25+5:30
उच्चशिक्षित आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद
नागपूर : बाहेरगावी जाण्यासाठी लागणारी पोलिसांची बनावट परमिशन पास (ई पास) तयार करून विकणाऱ्या एका उच्चशिक्षित आरोपीला पोलिसांनीअटक केली.
अंकुश गणेशराव मेतकर (वय २७) असे आरोपीचे नाव असून तो जुना सुभेदार नगरातील कोकरे ले आउटमध्ये राहतो. जुना सुभेदार ले आउट मध्ये राहणारे सागर सावळे हे पॅथॉलॉजी चालवितात. त्यांच्याकडे बुलढाणा येथील एका डॉक्टर कडून नियमित नमुने तपासणीसाठी येतात. तपासलेल्या नमुण्यांचा अहवाल बुलढाणा येथे पोहोचण्यासाठी साबळे यांना ई पासची आवश्यकता होती.
१८ मे रोजी मानेवाडातील शाहू गार्डन स्कूल जवळ आरोपीच्या जीएम टेक्निकल सर्विसेस नेट कॅफेवर त्यांना ऑनलाइन पास तयार करून मिळेल, असा फलक दिसला. त्यामुळे सावळे यांनी आरोपी अंकुश मेतकर यांच्याकडून १०० रुपयात ही पास बनवून घेतली आणि ते १९ मे रोजी त्यांच्या जयंत गोगटे नामक मित्रासह बुलढाणा येथे जायला निघाले. वाशिम जवळच्या अनसिंगी फाटा येथे पोलिसांनी त्यांची गाडी थांबवून त्यांच्या पासची तपासणी केली असता ही पास बनावट असल्याचे उघड झाले. त्या पासवर असलेला बारकोड हा चंद्रपूरच्या वैभव मेश्राम यांचा होता. तो नागपूर ते चंद्रपूर या प्रवासासाठी मंजूर करण्यात आल्याचेही पुढे पोलिसांच्या लक्षात आले। त्यामुळे वाशीम पोलिसांनी ही माहिती नागपूर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत, नायक श्रीकांत अनुप, शिपाई संतोष यांनी चौकशी करून बुधवारी आरोपी अंकुश मेतकर याला ताब्यात घेतले. उच्चशिक्षित असलेल्या अंकुशला संगणकाचे चांगले ज्ञान आहे. त्या ज्ञानाचा गैरवापर करत तो बनावट ई पास बनवीत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले.
पोलिसांकडून आवाहन
अशा प्रकारच्या बनावट पास कुणाकडूनही घेऊ नये. रीतसर शासनाच्या संकेत स्थळावर जाऊन परवानगी घ्यावी आणि अधिकृत पास घेऊनच कुठलाही प्रवास करावा, असे आवाहन पोलीस विभागाने यानिमित्ताने केले आहे.