उत्तर प्रदेशात खून करून मुंबईत लपलेल्या आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 09:40 PM2018-08-29T21:40:37+5:302018-08-29T21:41:02+5:30
विनोद हा ठाणेच्या मानपाडा परिसरात लपल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले, पोलिस निरीक्षक नितीन खेडेकर यांच्या पथकाने दुबेला अटक केली.
मुंबई - उत्तरप्रदेशमध्ये दोन गटातील वादातून हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ४ च्या पोलीसांना यश आले आहे. विनोद दुबे असे या आरोपीचे नाव आहे. मागील अनेद दिवसांपासून उत्तर प्रदेश पोलीसांना चकवा देत होता. गुन्हे शाखेच्या पोललीसांनी विनोदचा ताबा अधिक तपासासाठी यूपीच्या भरहलगंज पोलीसांना दिला आहे.
उत्तरप्रदेशच्या गोरखपूर परिसरातील भरहलगंज परिसरात मे महिन्यात दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी १५ मे रोजी दोन्ही गटांमध्ये झालेल्या वादात रमेश दुबे, विनोद दुबे, मनिष दुबे यांनी दुसऱ्या गटाचे श्यामप्रसाद हरबू यांच्या चुलत भावाची गोळ्या घालून हत्या केली होती. या गुन्ह्यात उत्तर प्रदेश पोलीसांनी रमेश आणि मनिषला अटक केली होती. मात्र विनोद या हत्येनंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी यूपीच्या हत्येतील आरोपी मुंबईत लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ४ च्या पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस विनोदच्या मागावर होते. दरम्यान विनोद हा ठाणेच्या मानपाडा परिसरात लपल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवले, पोलिस निरीक्षक नितीन खेडेकर यांच्या पथकाने दुबेला अटक केली. पुढील तपासासाठी पोलिसांनी विनोद दुबेचा ताबा भरहलगंज पोलीसांकडे दिला आहे.