कॅमेरे भाड्याने घेऊन विकणाऱ्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:38 AM2021-04-18T00:38:29+5:302021-04-18T00:38:29+5:30

सोशल मीडियाद्वारे करायचा व्यवहार : लाखोंचे १६ कॅमेरे, ९ लेन्स पोलिसांनी केले जप्त

Accused arrested for renting cameras | कॅमेरे भाड्याने घेऊन विकणाऱ्या आरोपीला अटक

कॅमेरे भाड्याने घेऊन विकणाऱ्या आरोपीला अटक

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नालासाेपारा : ओएलएक्स या सोशल मीडियाद्वारे कॅमेरे भाडेतत्त्वावर घेऊन विक्री व त्याकामी बनावट नाव, आधारकार्ड बनवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून पोलिसांनी लाखोंचे १६ कॅमेरे, ९ लेन्स जप्त केल्या आहेत. 


माणिकपूरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या हाती सीसीटीव्ही फुटेज भेटले होते. त्यानंतर आग्रा येथून मुंबईत कॅमेरा विकण्यासाठी आलेल्या आरोपीला पोलिसांच्या टीमने पकडले आहे. बाभोळा नाका येथील मधुबन बंगलो स्कीममधील अरमान बंगलोत राहणारे फोटोग्राफर कमलप्रीत रेखी (वय २८) याची फसवणूक झाली होती. २२ मार्चला घरी आलेले आरोपी योगेश चव्हाण व रिक्षाचालक दत्तात्रय भोसले या दोघांनी तीन दिवसांसाठी ३ लाख १५ हजार रुपये किमतीचा कॅमेरा भाड्याने घेत रिक्षाने निघून गेले होते. कॅमेऱ्याचा अपहार करून फसवणूक केल्याची तक्रार फोटोग्राफरने माणिकपूर पोलीस ठाण्यात देऊन गुन्हा दाखल केला होता. 


गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने तांत्रिक मदत व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. आरोपी हा विविध राज्यांत भटकंती करून राहत असल्याने त्याला शोधणे कठीण झाले होते. पोलीस पाळतीवर होते व तो आग्रा येथून मुंबईत कॅमेरा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर सापळा रचून त्याला अटक केली आहे. आरोपीचे मूळ नाव सिद्धेश सुनील महाले असून त्याने ओरिसा येथून विनाकागदपत्रे सिमकार्ड घेऊन ओएलएक्सवर अकाऊंट बनवले होते. त्याद्वारे कॅमेरे भाडेतत्त्वावर घेऊन ते इतरांना विकत असल्याची कबुली चौकशीत दिली. आरोपी हा फसवणूक करण्यासाठी सिद्धेश सुनील महाले ऊर्फ कार्तिक तिहारू पटेल ऊर्फ योगेश वासुदेव चव्हाण ऊर्फ नवनीत मोहन नायल ऊर्फ विक्रांत महादेव शेडगे आदी नावांचा वापर करीत असे. त्या नावांचे बनावट आधारकार्डही पोलिसांना सापडले आहे. आरोपीने नऊ ठिकाणी कॅमेरे चोरल्याची कबुली दिली असून तीन दिवस पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Accused arrested for renting cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.