उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर ब्लेडने हल्ला आरोपीही अल्पवयीन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 11:23 AM2021-05-29T11:23:54+5:302021-05-29T11:24:20+5:30
या मुलीस मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी हल्लेखोर अल्पवयीन मुलास रात्री उशिरा अटक केली व त्याची रवानगी सुधारगृहात केली.
उल्हासनगर : महापालिकेच्या बालाेद्यानात एका अल्पवयीन मुलीवर गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नशेखोर मुलाने ब्लेडने हल्ला केला. या मुलीस मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी हल्लेखोर अल्पवयीन मुलास रात्री उशिरा अटक केली व त्याची रवानगी सुधारगृहात केली.
उल्हासनगर, गोल मैदान परिसरातील बालोद्यानात गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर परिसरातील गर्दुल्ल्या मुलाने ब्लेडने सपासप वार करून गंभीर जखमी केले. या प्रकाराने खळबळ उडाली. दरम्यान, गर्दुल्ल्या मुलाने घटनास्थळावरून पळ काढला.
रात्री साडेअकरा वाजता मुलीला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला रात्रीच ठाणे येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी नेण्यात आले. तसेच हल्ला करणारा मुलगा अल्पवयीन असून त्याला अटक करून त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे समजते. हल्ला करणारा मुलगा मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त डी.टी. टेळे यांनी दिली. शहरात एका आठवड्यात खुनाच्या दोन घटना घडल्या. खून करणारे अट्टल नशेखोर आहेत.