प्रेयसीला जाळून ठार मारणाऱ्या आरोपी प्रियकराला जन्मठेप
By महेश सायखेडे | Published: October 10, 2023 11:38 PM2023-10-10T23:38:18+5:302023-10-10T23:38:31+5:30
केवळ ६०० रुपयांची मागणी केल्यामुळे उद्भवलेला वाद गेला होता विकोपाला
महेश सायखेडे, वर्धा : केवळ ६०० रुपयांची मागणी केल्यावर उद्भवलेला वाद विकोपाला जात प्रेयसीला प्रियकराने अंगावर रॉकेल टाकत आगीच्या हवाली करून जीवानिशी ठार केले. या प्रकरणातील आरोपीला वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दंडासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सचिन उर्फ बंटी कृष्णराव पाचघरे रा. वर्धमनेरी ता. आर्वी असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी दिला.
ठोस पुरावे व साक्षदारांची साक्ष तसेच दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन वर्धा येथील जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी आरोपी सचिन उर्फ बंटी कृष्णराव पाचघरे याला भादंविच्या कलम ३०२ अन्वये आजीवन कारावास व ५० हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या सश्रम कारावसाची शिक्षा ठोठावली आहे. तर मृताच्या दोन मुलांना नुकसान भरपाई म्हणून रूपये ४० हजार दंड रक्कमेतून समान रक्कम देण्याचे आदेशित केले आहे.
गुंडातील पाणी अंगावर घेत विझविली आग
मृतक सुनंदा मसराम व सचिन पाचघरे यांच्यात प्रेम संबंध होते. १८ डिसेंबर २०१५ ला दुपारी सुनंदा हिने सचिन याला भिसीचे पैसे भरण्याकरिता ६०० रुपयांची मागणी केली. याच कारणावरून वाद करून सचिन याने सुनंदा हिला मारहाण करून दिव्यातील रॉकेल तिच्या अंगावर टाकून तिला आगीच्या हवाली केले. जिवंत जळत असलेल्या सुनंदा हिने घरातील पाण्याने भरलेला गुंड स्वतः च्या अंगावर ओतून आग विझवली. त्यानंतर सुनंदा हिला तिची आई व मुलाने सुरूवातीला उपचारासाठी आर्वी येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने सुनंदा हिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. ६० टक्के भाजलेल्या सुनंदाचा उपचारादरम्यान २४ डिसेंबर २०१५ ला मृत्यू झाला.
एसडीपीओने केला तपास
संबंधित प्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर संबंधित गुन्ह्याचा तपास आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास व्ही. कानडे यांनी केला. तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले.
१३ साक्षदारांची तपासली साक्ष
संबंधित प्रकरणी न्यायालयात जिल्हा सरकारी अभियोक्ता गिरीष व्ही. तकवाले यांनी शासकीय बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई वैशाली ठाकरे यांनी काम पाहिले. शासनातर्फे एकूण १३ साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली.
दोन वेळा नोंदविले मृत्यूपूर्व बयाण
या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षदार नव्हता. मृतक ही रुग्णालयात उपचार घेत असताना दोन वेळा तिचे मृत्यूपूर्व बयाण पोलिस व नायब तहसीदारांनी नोंदविलेले होते. संबंधित बयाण या प्रकरणी महत्त्वाचेच ठरले.