कोठडीत सुनावलेल्या आरोपीला फिट आल्याने झाला मृत्यू, चौकशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:44 PM2022-02-28T14:44:11+5:302022-02-28T14:59:53+5:30
Accused Death : उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहीती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.
डोंबिवली - येथील मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आणि न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपी दत्तात्रय वारके याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विलगीकरण कक्षात त्याला फिट आल्याने त्याला उपचारासाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहीती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली.
आरोपी वारके विरोधात 5 फेब्रुवारीला शिवीगाळ, दमदाटी आणि छेडछाड प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून त्याचा शोध सुरू होता. अखेर त्याला शनिवारी भुसावळ येथून अटक करण्यात आली. त्याला रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान आरोपीला कल्याण आधारवाडी कारागृहात दाखल करण्याआधी कोविड चाचणी बंधनकारक असल्याने त्याला न्यायालयाच्या आदेशाने मानपाडा पोलिस ठाण्याच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथे असताना वारके ला संध्याकाळी पावणोसहाच्या सुमारास फिट आली आणि तो जमिनीवर पडला. त्याला लागलीच उपचारासाठी मनपाच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले गेले. मात्र काही तासांनी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अप्पर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी
दरम्यान कोठडीतील आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने मानपाडा पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहीती घेतली. पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह जे जे रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून डॉक्टरांच्या पॅनल खाली त्याचे शवविच्छेदन होणार आहे.
घर विक्रीच्या व्यवहारात फसवणूक
आरोपी दत्तात्रय हा एका बांधकाम व्यावसायिकाकडे कामाला होता. 2013 ला त्याने एका महिलेकडून घर विक्रीच्या व्यवहारात पाच लाख रूपये घेतले होते. मात्र घराचा ताबा महिलेला मिळत नव्हता. तीने दत्तात्रयकडे तगादा लावला, मात्र त्याच्याकडून योग्य प्रकारे उत्तर दिली जात नव्हती. एक दिवस त्याने महिलेबरोबर फोनवर बोलताना अश्लील संभाषण केले होते. त्याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.