डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपींनी सीबीआयची कागदपत्रे नाकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:41 AM2021-10-07T05:41:56+5:302021-10-07T05:42:28+5:30
Narendra Dabholkar murder case: पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला, ही कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची यादी देण्यास मुदत देण्याची मागणी ‘सीबीआय’च्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली.
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात सादर केलेली पुराव्यांशी संबंधित १३ महत्त्वाची कागदपत्रे आरोपीच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात नाकारली. त्यामुळे ‘सीबीआय’च्या विशेष सरकारी वकिलांना साक्षीदारांची यादी सादर करून ही कागदपत्रे सिद्ध करावी लागणार आहेत. पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप निश्चिती झाली असून, आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले. त्यामुळे ‘सीबीआय’ने गुन्हेगारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २९४ नुसार, पुराव्यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयात सादर केली.
कागदपत्रात घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनापूर्वीचा पंचनामा, मृत्यूची वैद्यकीय सूचना, फॉरेन्सिक प्रयोगशाळांचे अहवाल, आरोपीच्या कार्यालयातून दोन लॅपटॉप जप्त केल्याचा आणि आरोपींच्या छायाचित्रांचा मेमो अशा १३ कागदपत्रांचा समावेश आहे. ही सर्व कागदपत्रे बचाव पक्षाच्या वकील ॲड. सुवर्णा आव्हाड यांनी नाकारली.
साक्षीदारांची यादी देण्यास मुदतवाढ
ही कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची यादी देण्यास मुदत देण्याची मागणी ‘सीबीआय’च्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. तत्पूर्वी, मागील सुनावणीवेळी बचाव पक्षाने केलेल्या मागणीनुसार, या प्रकरणाची केस डायरी सीलबंद स्वरूपात न्यायालयात सादर करण्यात आली.
या प्रकरणात ‘सीबीआय’तर्फे न्यायालयात सादर केलेली सर्व कागदपत्रे बचाव पक्षाने नाकारली आहेत. त्यामुळे आता पुढील सुनावणीला साक्षीदारांची यादी दिली जाईल. त्यानंतर साक्षीदार तपासून ही कागदपत्रे सिद्ध करण्यात येतील. - ॲड. प्रकाश सूर्यवंशी, विशेष सरकारी वकील