खामगाव येथील घाटपुरी क्वारंटिन सेंटरमधून आरोपी पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 02:50 PM2021-05-11T14:50:56+5:302021-05-11T14:54:01+5:30
Khamgaon News : खामगाव येथील घटना; सोन्याच्या नकली गिन्न्या प्रकरणातील आरोपी पळाला.
खामगाव (जि.बुलडाणा) : साेन्याच्या नकली गिन्न्या देऊन फसवणूक करणाऱ््या टोळीतील एक आरोपी घाटपुरी रोडवरील क्वारंटीन सेंटरमधून पळून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापूर्वी अंत्रज येथील सोन्याच्या नकली गिन्नी देणाऱ्या टोळीचा पदार्फाश पोलिसांनी केला होता. त्यामध्ये २५ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये तपासादरम्यान काल ९ मे रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय जयपालसिंह ठाकूर यांनी एका संशयित आरोपीला अंत्रज येथून ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्याची सामान्य रुग्णालयात रॅपिड टेस्ट केली. त्यामध्ये त्याचा अहवाल पाँजिटिव्ह आल्याने घाटपुरी रोडवरील क्वारंटीन सेंटरमध्ये सोमवारी दुपारी ४ वाजताच्या ठेवण्यात आले. थोड्यावेळाने डॉक्टर पाहणीसाठी आले असता आरोपी रुग्ण हा सेंटर मधून पळून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सेंटरवर गोंधळ उडाला. विशाल मनीराम चव्हाण (वय २२) रा.अंत्रज असे पळून जाणाऱ्या आरोपी रुग्णाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नायक शैलेश राजपूत यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फियार्दीवरून आरोपी रुग्ण विशाल मनीराम चव्हाण याचे विरुद्ध भादवी कलम २,३,४ साथ रोग अधिनियमानुसार कलम १८८,२६९,२७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. असून पुढील तपास नापोका प्रदीप मोठे करीत आहेत.