फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीला दोन वर्षे कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 05:29 AM2020-12-26T05:29:49+5:302020-12-26T05:31:41+5:30
Crime News : गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या पोलीस उपायुक्तांचे तत्कालीन ॲण्टिरॉबरी स्कॉडने शाह याला गुजरात येथील नाडीयाद येथून अटक केली होती.
कल्याण : वृद्धांना भांडी आणि दागिने पॉलीश करून देण्याचा बहाणा करून दागिने लंपास करणाऱ्या आरोपीला कल्याण न्यायालयाने गुरुवारी दोन वर्षे तीन महिने साधी कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनोदप्रसाद शाह (४८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २०१८ मध्ये महात्मा फुले चौक पोलिसात नोंद झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती.
गुन्ह्याचा समांतर तपास करणाऱ्या पोलीस उपायुक्तांचे तत्कालीन ॲण्टिरॉबरी स्कॉडने शाह याला गुजरात येथील नाडीयाद येथून अटक केली होती. या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. आरोपीने जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० या कालावधीत कल्याण न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायालय ते उच्च न्यायालयापर्यंत पाच वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने तो नामंजूर केला होता. आरोपीवर असलेल्या इतर १३ गुन्ह्यांत जामीन होऊनही फसवणुकीच्या गुन्ह्यांत जामीन नामंजूर झाला होता. गुन्ह्यातील पुरावे व कागदपत्रांमुळे कोरोनाच्या परिस्थितीतही आरोपीला जामीन मिळाला नाही. अखेर गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील पहिल्या न्यायालयाने शाह याला दोन वर्षे तीन महिने साधी कैद आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास पाच दिवस साधी कैद त्याला भोगावी लागणार आहे.