सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने आरोपी मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:58 PM2019-10-31T13:58:59+5:302019-10-31T14:01:20+5:30
सीसीटीव्हीच्या देखभालीच्या खर्चाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबई - कुर्लारेल्वे स्थानकातील तिकीट तपासनीस कार्यालयावर दगडफेक झाली. या घटनेत तिकीट तपासनिसाला दगड लागून गंभीर जखम झाली. या प्रकरणी अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक बाब समोर आली आहे. नादुरुस्त सीसीटीव्हीमुळे अज्ञात आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. मध्य रेल्वेच्यासीसीटीव्ही आणि सीसीटीव्हीच्या देखभालीच्या खर्चाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
२८ ऑक्टोबर रोजी कुर्ला रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर सिकंदर सिंग यांची रात्रपाळी होती. रात्री ११ च्या सुमारास तिकीट तपासणीस कार्यालयावर अज्ञात इसमाने दगड भिरकाविला. या दगडफेकीत सिंग यांच्या चेहरा आणि डोळ्यावर गंभीर दुखापत झाली. दोन दिवस उलटूनदेखील अज्ञात इसमाचा शोध लागला नाही. त्यामुळे कुर्ला रेल्वे स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्यांसह प्रवाशांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र सीसीटीव्ही फूटेजमधील अज्ञात इसमाचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे इसमाचा शोध घेण्यासाठी रेखाचित्रकाराची मदत घेण्यात येणार आहे.