'या' आरोपीने मराठी अभिनेत्रीकडे देखील मागितली होती खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 08:52 PM2019-04-30T20:52:24+5:302019-04-30T20:54:46+5:30
७ महिलांकडे अशा प्रकारे ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे
मुंबई - कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगून तरुणींशी जवळीक साधून त्यांचे फोटो माॅर्फ करून तरुणींकडे खंडणी मागणाऱ्या सिद्धार्थ सरोदेच्या काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने मुसक्या आवळल्या. त्याने अशा प्रकारे ७ महिलांकडे अशा प्रकारे ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. त्यात एका मराठी अभिनेत्रीचाही समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
चेंबूरचा रहिवाशी असलेला सरोदे हा फेसबुक आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून माॅडेलशी संपर्क साधायचा. त्यावेळी तो स्वतःची ओळख कास्टिंग डायरेक्टर असल्याचे सांगायचा. तरुणींना टीव्ही मालिका, चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी देतो अशी बतावणी करून तो महिलांचा विश्वास संपादन करत असे. चित्रपटात काम करता येईल या आशेपोटी मोठ्या संख्येने तरुणी त्याच्या संपर्कात आल्या होत्या. अनेक तरुणी त्याला चित्रपटात काम मिळावे म्हणून स्वतःच्या माॅडलिंगचे फोटोही पाठवायच्या. तरुणींचे हेच फोटो पिक्सआर्ट या गुगल अॅपच्या मदतीने माॅर्फ करून तो अश्लील फोटो बनवायचा.
सरोदे याने २०१७ मध्ये बोरिवली रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट घडवण्याची अफवा पसरवली होती. त्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक करत त्याची रवानगी भायखळाच्या आर्थर रोड कारागृहात केली होती. कारागृहात त्याच्यासोबत असलेला एक आरोपी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. त्याच्याकडून माहिती मिळवत सरोदेने जामीनावर बाहेर आल्यानंतर तरुणींना जाळ्यात ओढत खंडणी उकळण्यास सुरूवात केल्याचे सांगितले. नवघर परिसरातील तरुणींकडून त्याने २५ हजार, वर्सोवा येथील मॉडेलकडून १ लाख आणि ठाण्यातील तरुणीकडून २५ हजार उकळल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. तर उर्वरित पाच तरुणींशी पोलिसांनी संपर्क साधला असता त्या तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यात पाच तरुणींमध्ये चेंबूर परिसरात राहणाऱ्या एका मराठी अभिनेत्रीचाही समावेश असल्याचे समजते.
कशी होती मोडस ऑपरेंडी?
महिलांचे अश्लील फोटो बनवून ते सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या सिध्दार्थ सरोदेस गुन्हे शाखेच्या कक्ष - ९ अटक केली आहे.वर्सोवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने पीडित महिलेशी व्हॉटस अॅपवर चॅट करून तिचा चेहरा आणि दुसऱ्या नग्न महिलेचे शरीर असलेला एक पुरूषासोबतचा अश्लील फोटो मॉर्फ करून इंग्रजीत महिलेचे नाव आणि कॉलगर्ल असे लिहिलेला पीडित महिलेला पाठविले. हा फोटो सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडित महिलेकडे १ लाख रुपयांची मागणी केली होती. नेहमीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीचा मोबाईल वेळोवेळी तपासादरम्यान बंद आढळून येत होता. तरीदेखील कक्ष ९ चे पोलीस शिपाई प्रफ्फुल पाटील आणि महिला पोलीस शिपाई पुजारी यांनी आरोपीच्या मोबाईलवरून सविस्तर तपास करून गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीने किमान ७ महिलांना सोशल मीडियावर गाठून अशा प्रकारे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी सिद्धार्थ महिलांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग डायरेक्टर असल्याचे खोटे सांगून त्यांचे फोटो मिळवून ते पिक्सआर्ट या गुगल अॅपच्या मदतीने अश्लील फोटो तयार करत असे.