महिलेची गळा चिरून हत्या; आरोपी धड घेऊन फरार, माथेरानमधील घटना, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 04:30 PM2021-12-12T16:30:30+5:302021-12-12T16:31:24+5:30
महिलेचे मुंडके हत्या करणाऱ्याने कापून नेले असल्याने परिसरामध्ये दहशतीचे वातावरण आहे.
- मुकुंद रांजाणे
माथेरान: माथेरानमधील इंदिरा नगर परिसरामध्ये एका महिला पर्यटकांची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ह्या महिलेचे मुंडके हत्या करणाऱ्याने कापून नेले असल्याने परिसरामध्ये दहशतीचे वातावरण आहे.
माथेरानमधील इंदिरा नगर परिसरामध्ये अनेक लॉजिंग व्यवसाय करीत असतात अशाच एका ठिकाणी ही घटना घडली असून शनिवारी या ठिकाणी एक जोडपे राहण्यासाठी आले होते. नेहमी प्रमाणे लॉजिंग मालकाने त्यांची नावे रजिस्टरमध्ये लिहून त्यांना खोली भाड्याने दिली होती व सकाळी जेव्हा या पर्यटकांना पाहण्यासाठी गेले असता महिलेचे धड कॉटखाली निर्वस्त्र अवस्थेत आढळून आले आणि शीर गायब होते.
सदर महिलेस अतिशय निर्घृणपणे मारण्यात आले असून खुन्याने कोणताही पुरावा मागे राहणार नाही, ह्याची पुरेपर खबरदारी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून धडापासून शीर वेगळे करून सदर धड निर्वस्त्र अवस्थेत खुनी तिथेच सोडून गेला आहे तर महिलेचे शीर व कपडेसोबत घेऊन जाताना सदर खोलीतील रक्त ही पुसले असल्याचे दिसून येत होते. ही घटना समोर आल्यानंतर दोघांचेही ओळखपत्र तपासले असता रूम घेताना दिलेली माहिती खोटी असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे दोघांचीही नावे व पत्ता खोटा असल्याचा संशय घेण्यात येत आहे.
मागील काही दिवसांमध्ये माथेरान मध्ये अल्पवयीन मुलांचा वावर वाढला असून आशा लोकांना सावज करून माथेरान बाहेरील अनेक जण दलाली करून त्यांना खोल्या उपलब्द करून देत आहेत. तर नेरळ येथे ही अल्पवयीन व पर्यटकांना खोटी माहिती पुरवून माथेरानमध्ये तिथूनच रूम्स विकण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा लोकांमुळे माथेरानमध्ये अनधिकृत लॉजिंग व्यवसायाचे पेव वाढत चालले असून काहीजण तर ओळ्खपत्राची छाननी ही बरोबर करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा माथेरान विरोधी लोकांना रोखल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत असे स्थानिकांचे म्हणणे आहे