१६२ वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 11:12 PM2023-05-17T23:12:48+5:302023-05-17T23:13:10+5:30
शिवाजी उत्तम गरड नावाच्या २४ वर्षीय गुन्हेगाराने घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: वाहनचोरीच्या १६२ गुन्ह्यांमध्ये पकडलेल्या आरोपींचा साथीदार असलेल्या एका आरोपीने विश्रामबाग पोलिस कोठडीतील (लॉकअप) शौचालयाच्या लोखंडी जाळीच्या गजाला चारीच्या काठाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजी उत्तम गरड (वय २४, रा. हडपसर, मुळ रा. कारंजा गरड, रिसोड, वाशिम) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी, गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने शहरातील वाहन चोरीचे १६२ गुन्हे उघडकीस आणले. त्यात चार जणांना अटक केली होती. त्यात शिवाजी गरड याचा मेव्हणा सचिन कदम याचाही समावेश आहे. या आरोपींनी शिवाजी गरड याचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी ११ मे रोजी त्याला वाशिम जिल्ह्यातील गावातून पकडले. त्याला १२ मे रोजी न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला घेऊन पोलीस पथक गावी गेले होते. तेथून ३ वाहने जप्त करण्यात आली. त्याला घेऊन पथक मंगळवारी रात्री उशिरा पुण्यात आले होते.
बुधवारी पहाटे दोन वाजता त्याला विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले. दरम्यान सकाळी सहा वाजताच्या सुमारास एक आरोपी लघुशंकेसाठी शौचालयाकडे गेला तेव्हा शिवाजी शौचालयाच्या लोखंडी जाळीच्या गजाला लटकलेला दिसला. त्याने पांघरण्यासाठी दिलेल्या चादरीचा काठ फाडून दोर तयार करुन त्याने गळफास घेतला.
घटनेची माहिती मिळताच सीआडीच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. एखाद्या आरोपीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला तर नियमानुसार त्याचा तपास सीआडीकडून केला जातो. लॉकमध्ये शौचालय सोडून सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. सकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान शिवाजी याने गळफास घेतला असावा, यापुर्वी तो कॅमेर्यात दिसून येत आहे. त्याने तशी टेहळणी देखील केल्याचे दिसते. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा त्याचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
सराईत गुन्हेगार शिवाजी गरड हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर यापूर्वीचे ३ गुन्हे आहेत. त्यापैकी २ एटीएम फोडीचे गुन्हे आहेत. तो वेल्डिंगचे काम करीत असे. त्यामुळे त्याला इतरांनी मदतीला घेतले होते. त्याच्या मेव्हण्याने वाहनचोरीतही त्याचे नाव सांगितल्याने पोलिसांनी अटक केली होती. लॉकअपमध्ये इतर आरोपींनी आमच्या प्रमाणे तुझ्यावरही अनेक गुन्हे टाकले जातील, अशी भिती दाखविली असण्याची शक्यता आहे. त्यातून त्याने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे.