जिलेटीन स्फोटके प्रकरणातील आरोपींना अकरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 08:52 PM2022-02-02T20:52:53+5:302022-02-02T20:53:24+5:30
भिवंडीत जिलेटीन व डिटोनेटर विक्रीसाठी आलेल्या तिघांना नदीनाका परिसरात सापळा लावून भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.
नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडीत जिलेटीन व डिटोनेटर विक्रीसाठी आलेल्या तिघांना नदीनाका परिसरात सापळा लावून भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील ( वय ३४ वर्ष, राहणार आपटी खुर्द, ता. विक्रमगड, पालघर ) पंकज अच्छेलाल चौहान ( वय २३ वर्ष, राहणार विक्रमगड, ) व समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा ( वय २७ वर्ष, राहणार वेडगेपाडा, ता. विक्रमगड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या तिघांकडून २० हजार रुपये किंमतीच्या जिलेटीनचे ५ बॉक्समध्ये साठवलेले एकुण १००० नग तर २५ हजार रुपये किंमतीचे १००० नग डीटोनेटर सह चार लाख रुपये किंमतीची मारूती इको कार असा एकुण रू. ४ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त करून तिघा आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता ११ फेब्रुवारी पर्यंत १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आरोपींनी हे जिलेटीन नेमकी कोणत्या उद्देशाने आणले होते या बाजूने गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला आहे.