सोन्याच्या दातामुळे १५ वर्षांनी आरोपी जाळ्यात, मुंबई पोलिसांची कामगिरी; नेमकं प्रकरण काय वाचा...

By मनीषा म्हात्रे | Published: February 10, 2023 01:33 PM2023-02-10T13:33:26+5:302023-02-10T13:34:04+5:30

आवड म्हणून लावलेल्या सोन्याच्या दोन दातांमुळेच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

Accused in jail after 15 years due to gold teeth Mumbai police action | सोन्याच्या दातामुळे १५ वर्षांनी आरोपी जाळ्यात, मुंबई पोलिसांची कामगिरी; नेमकं प्रकरण काय वाचा...

सोन्याच्या दातामुळे १५ वर्षांनी आरोपी जाळ्यात, मुंबई पोलिसांची कामगिरी; नेमकं प्रकरण काय वाचा...

Next

मुंबई :

आवड म्हणून लावलेल्या सोन्याच्या दोन दातांमुळेच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दोन सोन्याच्या दाताच्या माहितीवर रफी किडवाई मार्ग पोलिसांनी १५ वर्षापासून फरार असलेल्या प्रवीण आशुभा जडेजा उर्फ प्रवीणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा (३८) याला बेड्या ठोकल्या आहेत. तो स्वतःची ओळख लपवून राहत होता. पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्याला विम्याच्या रकमेचे आमीष दाखवून जाळ्यात ओढले आहे.

हिंदमाता परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय करणारे तक्रारदार ए. एच. गंगर (४०) यांच्याकडे जडेजा हा १५ वर्षांपूर्वी कामाला होता. अन्य व्यापाऱ्यांकडे उसने असलेली रक्कम गंगर यांनी प्रवीणला आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी मिळालेल्या ४० हजार रुपयांवर त्याने डल्ला मारला. तसेच, शौचालयात कोणीतरी रक्कम असलेली पिशवी चोरल्याचा बनाव रचला. याप्रकरणी रफी किडवाई मार्ग पोलिसांनी भादंवि कलम ४०८ अंतर्गत गुन्हा नोंदवत  आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात हजर राहत नव्हता. अखेर दादर येथील न्यायालयाने त्याच्याविरोधात स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला फरार घोषित केले होते.

गेल्या १५ वर्षांपासून जडेजा फरार होता. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस हवालदार नारायण कदम, सुरेश कडलग, रवींद्र साबळे, महिला पोलीस शिपाई विद्या यादव व पोलीस शिपाई सुशांत बनकर यांनी तपासाला सुरूवात केली. जडेजा बाबत पोलिसांकडे जास्त माहिती नव्हती. फक्त  आरोपीचे पुढील दोन दात सोन्याचे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरू केला. 

त्याच्या आडनावावरून तो गुजरातमधील कच्छ येथील रहिवासी असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी हातातील माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन सुरू केले. अखेर, खबऱ्याकडून सोन्याचे दात, वयोगट, कामधंदा या गोष्टींशी मिळताजुळती व्यक्ती तेथे असल्याचे निष्पन्न होताच पथकाने सापळा रचला.
संशियाताशी संपर्क साधून विम्याचे पैसे घेण्यासाठी मुंबईत बोलावले. पैशांसाठी मुंबईत येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. तेव्हा, तो प्रवीणच असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. 

नावाची हेराफेरी
विशेष म्हणजे आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी  प्रवीणऐवजी प्रदीपसिंह असे नाव बदलले होते. त्याने आणखीन कुणाला फसवले आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. 

Web Title: Accused in jail after 15 years due to gold teeth Mumbai police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.