मीरा रोड हत्याकांड प्रकरण: हत्येनंतर मनोज 'तिचे' रोज तुकडे करत होता; आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 04:23 PM2023-06-08T16:23:50+5:302023-06-08T16:26:53+5:30
"कहर म्हणजे हत्येनंतर तो सलग चार दिवस तिच्या शरीराचे तुकडे करत होता..."
जितेंद्र कालेकर -
ठाणे : गेल्या दहा वर्षांपासून सरस्वती वैद्य (३२) हिच्या बरोबर एकत्रित राहणाऱ्या मनोज साहनी (५६) याने तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. त्याहूनही कहर म्हणजे हत्येनंतर तो सलग चार दिवस तिच्या शरीराचे तुकडे करत होता, अशी माहिती नयानगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दिली. अशा क्रूरकर्म्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर ठाणे न्यायालयाने १६ जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत.
बोरीवलीमध्ये शीधा वाटप केंद्राचे दुकान सांभाळणाऱ्या मनोजची सरस्वतीबरोबर २०१४ मध्ये ओळख झाली. याच ओळखीतून ते एकमेकांच्या प्रेमात पडले. तिला आई वडिल कोणीच नाही. तर त्यालाही आई वडिल नाहीत. त्याच्या रेशनिंग दुकानावर येण्यामुळेच त्यांच्यातील संबंध वाढत गेली. दहा वर्षांपासून ते एकत्र वास्तव्याला असले तरी त्यांचे लग्न झालेले नव्हते. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडणे होतच होती. याच भांडणातून त्याने तिची ४ जूनला हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तो तिचे रोजच तुकडे करीत होता.
आता त्याने यातील काही तुकड्यांची कुठे विल्हेवाट केली आहे? हत्येमागे नेमकी कोणते कारण घडले? त्याच्या भार्इंदर पूर्व भागातील गीता आकाशदीप इमारतीमधील घरात एक वूड कटरही पोलिसांना मिळाले आहे. पण, हत्या करण्यासाठी मनोजने नेमका कशाचा वापर केला? यात त्याचे आणखी कोणी साथिदार आहेत का? या सर्वच बाबींचा सखोल तपास करण्यासाठी नयानगर पोलिसांनी आरोपी मनोजला १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी दीवाणी न्यायाधीश एम. डी. ननावरे यांच्याकडे केली. न्यायालयाने सर्व बाजू पडताळल्यानंतर आरोपीला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्यामुळे नयानगर पोलिसांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.