'मोक्का'तील आरोपींनी कळंबा कारागृहातूनच रचले खंडणीचे षडयंत्र; गुंड बंटी जाधवसह तिघांना अटक
By दत्ता यादव | Published: August 5, 2023 11:45 PM2023-08-05T23:45:08+5:302023-08-05T23:45:17+5:30
वाई पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून कळंबा कारागृहात असलेला गुंड बंटी जाधवसह तिघांच्या मुसक्या आवळल्या.
सातारा : ‘मोक्का’च्या गुन्ह्यात कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात असलेल्या गुंडांनी थेट कारागृहातून फोन करून मेणवलीच्या हाॅटेल मालकाला तब्बल दहा लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात समोर आली. यानंतर वाई पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून कळंबा कारागृहात असलेला गुंड बंटी जाधवसह तिघांच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेणवली, ता. वाई येथील ‘हॉटेल माधवन इंटरनॅशनल’मध्ये १ जून २०२३ रोजी दुपारी सव्वाएकच्या सुमारास १५ जण गेले. हॉटेल व्यावसायिकाला पिस्तूल रोखून त्यांच्याकडे १० लाख रुपयांच्या खंडणीची त्यांनी मागणी केली. तसेच त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने ओढून संशयितांनी पलायन केले. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात एकूण १५ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील १२ जणांना वाई पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समजली.
या खंडणीचे मुख्य सूत्रधार बंटी जाधव असून, त्याने त्याचे साथीदार निखील मोरे, अभिषेक मोरे यांच्या सोबतीने कळंबा कारागृहातूनच थेट फोनद्वारे हॉटेल मालकाला खंडणी मागितली. एवढेच नव्हे तर संशयितांनी खंडणीचे षडयंत्र कळंबा कारागृहातच रचले. त्यांच्या हस्तकांना हॉटेल मालकाकडे पाठवून त्यांनी खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. ही बाब तपासात समोर आल्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी तातडीने तपास सुरू केला.
मोक्कामध्ये कारागृहात असलेल्या आरोपींचा या गुन्ह्यात कसा सहभाग आहे, हे भरणे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने आरोपींना कारागृहातून वाई पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. शनिवारी वाई पोलिसांनी गुंड बंटी जाधव, निखील मोरे, अभिषेक मोरे यांना कळंबा कारागृहातून अटक केली. त्यानंतर त्यांना वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
कारागृहात फोन पोहोचला कसा...
बंटी जाधवने थेट कारागृहातून खंडणी मागितली आहे. परंतु त्याच्याजवळ पोलिसांना फोन सापडला नाही. आता त्या दिवसाचे सीडीआर काढून पोलिस पुरावा गोळा करणार आहेत. तसेच कारागृहात फोन कोणी दिला, याची चाैकशी केली जाणार आहे.