येसगाव खून प्रकरणातील आरोपी तासाभरात जेरबंद; कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी
By सचिन धर्मापुरीकर | Published: September 12, 2023 06:08 PM2023-09-12T18:08:51+5:302023-09-12T18:09:10+5:30
कोपरगाव (अहमदनगर) : पैशाच्या वादातून सोमवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे इसमाचा खून झाला होता. या प्रकरणात रात्री उशिरा ...
कोपरगाव (अहमदनगर) : पैशाच्या वादातून सोमवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे इसमाचा खून झाला होता. या प्रकरणात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोपरगाव तालुका पोलिसांनी तासाभराच्या आत चार आरोपींना जेरबंद केले.
सोमवार दि. ११ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील कमानी जवळ दिपक दादा गांगुर्डे (वय ४०) या गवंडी काम करणाऱ्या इसमाने उषा सुनिल पोळ, स्नेहा सुनिल पोळ, राज उर्फ बबलु सुनिल पोळ व आण्णा उर्फ अनिल प्रमोद गायकवाड ( सर्व रा. येसगाव ता. कोपरगाव) यांनी गवंडी कामाच्या मजुरीचे राहिलेले पैसे मागितले. पैसे मागितल्याचा चौघांना राग आला. आरोपींनी मयत दिपक गांगुर्डे यास लाथाबुक्यानी, दगडाने माराहण करुन लाकडी दांड्याने डोक्यात घाव घातले. त्यानंतर आरोपी पसार झाले.
या घटनेबाबत मयताची पत्नी जया दिपक गांगुर्डे यांनी फिर्यादी दिली. त्यावरुन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी घटनास्थळी पोहचुन आरोपींच्या शोधासाठी पथक तयार केले. पोलीस पथक आरोपींचा शोध घेत असताना, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना गोपनिय बातमी मिळाली की, सदरचे आरोपी हे स्मशाभुमीचे जवळ, झाडामध्ये लपुन बसलेले आहे. त्यानुसार पोलीसांनी स्मशानभुमी परीसर पिंजून काढून सर्व आरोपींना शिताफीने तासाभरात पकडले आहे.
ही कारवाई कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक आंधळे, पो.काॅ. जयदिप गवारे, रशिद शेख, युवराज खुळे, राघव कोतकर, प्रकाश नवाळी, चंद्रकांत मेढे, अंजना भांगरे, ज्योती रहाणे, फिजा पठाण यांनी केली. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल हे करित आहेत.