साकीनाका बलात्कार, हत्या प्रकरणात आरोपी मोहन चौहान दोषी, १ जूनला शिक्षा सुनावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 03:28 PM2022-05-30T15:28:09+5:302022-05-30T15:28:52+5:30
Sakinaka rape and murder case : मोहन चौहानला खून, बलात्कार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांसह दोषी ठरवण्यात आले.
३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर आठ महिन्यांनी दिंडोशी सत्र न्यायालयाने सोमवारी ४४ वर्षीय आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवलं आहे. आता दिंडोशी सत्र न्यायालय 1 जून रोजी शिक्षा सुनावणार आहे.
मोहन चौहानला खून, बलात्कार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांसह दोषी ठरवण्यात आले.
१० सप्टेंबर २०२१च्या मध्यरात्री साकी नाका येथे महिला जखमी अवस्थेत आढळली. तिला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे ११ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात चौहानला अटक करण्यात आली. राज्य सरकारने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांची नियुक्ती केली होती. अवघ्या १८ दिवसांत पोलिसांनी चौहानविरुद्ध ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले. असा दावा करण्यात आला आहे की, आरोपीने पीडितेच्या खाजगी भागात धारदार वस्तू घातली होती, ज्यामुळे गंभीर जखमा झाल्या होत्या.
काय घडलं होतं?
खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. १० सप्टेंबर २०२१ च्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान त्या कंपनीच्या सुरक्षारक्षकाने कंट्रोल रुमला फोन करून एका बाईला मारहाण सुरु असल्याचं कळवलं होतं. माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवलं. संबंधित पोलीस अधिकारी दहा मिनिटात घटनास्थळी पोहोचले होते. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती. त्यावेळी पोलिसांनी महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी वॉचमनकडून घेऊन टेम्पो चालवत तिला राजावाडी रुग्णालयात नेलं होतं. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले होते. सुरक्षारक्षकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.