एक हजार कोटींना गंडा घालणारा दिल्लीचा महाठग नाशकात जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 02:47 PM2022-03-26T14:47:11+5:302022-03-26T14:47:21+5:30
५० हजारांचे त्याच्यावर जाहीर केले होते बक्षीस
नाशिक: दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब या राज्यांमधील विविध शहरांमध्ये गुंतवणुकदार, खरेदीदारांची २०१६ ते २०१८ सालामध्ये सुमारे १ हजार कोटींची फसवणूक करुन फरार झालेला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार पीयुष तीवारी (४२) यास सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर उत्तर दिल्ली पोलिसांच्या ‘एएटीएस’च्या पथकाने नाशिकमध्ये बेड्या ठोकल्या. तीवारी हा नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून स्वत:ची ओळख, चेहरा बदलून एक मोठा कांदा व्यावसायिक पुनीत भारद्वाज नावाने वास्तव्यास होता, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
२०११सालापासून बांधकाम व्यावसायिक म्हणून व्यवसायाला संशयित पुनीत याने सुरुवात केली. २०१८सालापर्यंत त्याने १५ ते २० लहान व ८ मोठ्या कंपन्या सुरु केल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या मयुरविहार, आनंदविहारसह विविध पोलीस ठाण्यात तसेच उत्तरप्रदेशच्या नोएडा, सुरजपुर तसेच पंजाबच्या अमृतसर शहरासह अन्य पोलीस ठाण्यांमध्ये मिळून एकुण ३७ फसवणुकीचे गुन्हे पीयुषव दाखल आहेत. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर ५० हजारांचे बक्षीसदेखील जाहिर केले होते. हा महाठग मागील सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
उत्तर दिल्ली पोलिसांनी त्याचा माग काढत विविध राज्यांमधील शहरे पालथी घातली होती. अखेर खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे नाशिकमध्ये उत्तर दिल्ली पोलिसांच्या ॲन्टी ऑटो थेफ्ट युनीटचे (एएटीएस) पथक येऊन धडकले. पथकाने नाशिकमध्ये संशयित पीयुषची माहिती काढत सापळा रचला आणि शिताफीने त्यास बेड्या ठोकल्या. त्याने नाशिकमध्येही एका हॉटेल व्यावसायिकासोबत भागीदारी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सुत्राने दिली आहे.
...म्हणून फसवणूकीचा नवीन ‘उद्योग’
२०१६साली प्राप्तीकर विभागाच्या झालेल्या कारवाईमुळे व्यवसाय डबघाईस आला. यामुळे पीयुष तीवारी याने स्वत:ला बिल्डर भासवून नवीन व्यवसाय करत दिल्ली एनसीआरमध्ये फ्लॅट, प्लॉटस् विक्री करण्याच्या नावाखाली गुंतवणुकदारांना गंडा घालण्यास सुरुवात केली. एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करत त्याने ‘माया’ जमविली होती. दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी पीयुष तीवारी याने मिळविली आहे.