जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, वसई रेल्वे पोलिसांना तपासले दीडशे सीसीटीव्ही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 03:43 PM2023-04-19T15:43:42+5:302023-04-19T15:46:06+5:30
पोलिसांनी आरोपीकडून वसई रेल्वे पोलीस ठाण्यातील ४ आणि बोरिवली येथील २ असे एकूण ६ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा - रेल्वे स्थानकात लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गळ्यातून सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला दीडशे सीसीटीव्ही तपासून वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून वसई रेल्वे पोलीस ठाण्यातील ४ आणि बोरिवली येथील २ असे एकूण ६ गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
वसई व मीरा रोड रेल्वे स्थानकात लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या चार घटना २७ मार्च, ३० मार्च, १ एप्रिल व ६ एप्रिल रोजी घडल्या होत्या. अशा प्रकारचे सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे वसई रोड रेल्वे पोलीस दाखल झाले होते. या गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघड करणेबाबत वरिष्ठाकडून रेल्वे पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या.
वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटिकरण पथक हे करीत होते. गुन्हा घडलेल्या ठिकाणचे रेल्वे स्थानकावरील सीसीटीवी फूटेजमध्ये एक संशयित आरोपी टोपी व मास्क परीधान करून गुन्हा करून स्टेशन बाहेर पळून जाताना दिसत होता. फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती प्रत्येक वेळी गुन्हा करताना आपले कपडे वेगवेगळे घालत होता व तोंडाला मास्क व टोपी घालुन आपला चेहरा होता. त्यामुळे त्याला शोधणे हे आव्हान होते.
एका फुटेजमध्ये आरोपी हा बस स्टेशन पूर्व बाजूस बाहेर पडून रिक्षा पकडून गेल्याचे दिसले. त्यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने शहर हद्दीतील नालासोपारा, वसई परिसरातील १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीच्या हालचाली व हावभावावरुन नालासोपारा पूर्व परिसरात त्याच्यासारखा दिसणारा एका व्यक्तीचे निरीक्षण केले व त्या परिसरात दिवसरात्र सापळा लावून रात्रीच्या वेळी मास्क व टोपी घालून चोरीच्या उद्देशाने जात असल्याचे दिसून आल्यावर त्याला तात्काळ कौशल्याने ताब्यात घेतले.
मोहम्मद अमन मुसल हुसैन (३०) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे अधिक तपास त्याने चारही गुन्हे केल्याची कबुली दिल्यावर ९ एप्रिलला त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे तपास केल्यावर वसईचे ४ आणि बोरिवलीचे २ असे ६ गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून ६ गुन्यात गेलेला सर्व मुद्देमाल सोन्याचे दागिने असे एकूण ४ लाख १६ हजार ७५० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.