भावांची हत्या करणाऱ्या आरोपीला दुहेरी जन्मठेप; १० वर्षांचा कारावासही भोगावा लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 09:38 AM2022-03-12T09:38:08+5:302022-03-12T09:38:18+5:30
देवकर बंधू रात्री जेवण करून पावणेबाराच्या सुमारास घराबाहेर बसले होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या आणि मनोज खांडगेसह दुचाकीवरून आलेल्या संजय नामदेव पाटील (वय ३८) ने तिघा भावांवर चाकूने सपासप वार केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : डिसेंबर २०१० मध्ये कल्याणमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी आरोपी संजय नामदेव पाटील याला दुहेरी जन्मठेप आणि १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
मागील भांडणाच्या रागातून पश्चिमेकडील रामदासवाडी परिसरातील अशोक आणि कृष्णा देवकर या दोन सख्या भावांची संजयने, मनोज खांडगेसह दुचाकीवरून येऊन घराजवळच चाकूने वार करून हत्या केली होती. तर देवकर यांचा अन्य एक सख्खा भाऊ रामदास याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यालाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
देवकर बंधू रात्री जेवण करून पावणेबाराच्या सुमारास घराबाहेर बसले होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणाऱ्या आणि मनोज खांडगेसह दुचाकीवरून आलेल्या संजय नामदेव पाटील (वय ३८) ने तिघा भावांवर चाकूने सपासप वार केले. यात अशोक (वय ४०) आणि कृष्णा (वय ३२) यांचा मृत्यू झाला तर, रामदास (वय ४२) हे गंभीर जखमी झाले होते. ही घटना ३ डिसेंबर २०१० घडली होती. रामदास यांच्या तक्रारीवरून संजय आणि मनोज याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाण असे गुन्हे दाखल झाले होते. दोघा आरोपींना ४ डिसेंबरला अटक केली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. के. बानकर आणि पोलीस निरीक्षक आर. एम. आव्हाड यांनी या गुन्ह्याचा तपास करून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. निकाल जिल्हा न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी दिला. सरकारी वकील म्हणून अश्विनी भामरे- पाटील यांनी काम पाहिले.
दोघांपैकी एका आरोपीचा मृत्यू
संजय पाटील आणि मनोज खांडगे या दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल होता. परंतू, मनोजचा न्यायालयात सुनावणी चालू असताना दरम्यानच्या कालावधीत मृत्यू झाला असल्याने संजय पाटील याला शिक्षा ठोठावण्यात आली.