एकतर्फी प्रेमातून ठाण्यात तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Updated: December 13, 2024 20:45 IST2024-12-13T20:37:34+5:302024-12-13T20:45:00+5:30
ठाणे न्यायालयाचा निर्णय: ५० हजारांच्या दंडाचीही शिक्षा

एकतर्फी प्रेमातून ठाण्यात तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
ठाणे: ठाण्यातील तीन हात नाका भागात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूचे वार करुन खून करणाऱ्या आकाशकुमार पवार (२३) या आरोपीला जन्मठेपेसह ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणेन्यायालयाने सुनावली आहे. त्याचबरोबर हत्यार कायद्याखालीही एक वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजाराच्या अतिरिक्त दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
ठाण्यातील मुंबई नाशिक पूर्व द्रूतगती मार्गावरील आरटीओ कार्यालयासमोर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर ४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास प्राची झाडे या महाविद्यालयीन तरुणीच्या खूनाचा हा प्रकार घडला होता. प्राची ही बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना आरोपी आकाश तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता.
घटनेच्या दिवशी प्राची ही नेहमीप्रमाणे तिच्या शादी डॉट कॉम या नोकरीच्या ठिकाणी स्कूटरवरुन जात होती. त्याच दरम्यान मोटारसायकलवरुन आलेल्या आकाशने तिची स्कूटर भर रस्त्यात अडवून तिच्या पोटात, छातीवर, गळयावर, हातावर, डोक्यावर आणि पाठीवर १३ वार केले. यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला.
धक्कादायक म्हणजे तिच्यावर तो निघृणपणे वार करीत असतांना एका सुरीचे पाते तिच्या शरीरात अडकून राहिले आणि त्याची मूठ त्याच्या हातात आल्याने ती मूठ तिथे फेकून त्याने दुसऱ्या सुरीनेही तिच्यावर वार केले होते. हा प्रकार सुरु असतांना लोकांची गर्दी झाल्यानंतर त्याने तिथून पलायन केले होते.
पोलिस मागावर येतील, या भीतीने तो भिवंडीच्या नारपोली पोलिस ठाण्यात हजर झाला होता. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक अविनाश सोंडकर यांनी आरोपीला अटक करुन यातील वैद्यकीय, परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुरावे गोळा केले होते.
याच संपूर्ण खटल्याची सुनावणी ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश अग्रवाल यांच्या न्यायालयात १२ डिसेंबर २०२४ रोजी झाली. वरीष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून हवालदार लोहार आणि राठोड यांनी काम पाहिले. सरकारी वकील लाडवंजारी यांनी आरोपीच्या शिक्षेसाठी जोरदार बाजू मांडली. २० साक्षीदार आणि पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी मानून त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.