वाघ, बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात; गोंदियात तीन जणांना घेतलं ताब्यात
By अंकुश गुंडावार | Updated: February 19, 2025 20:50 IST2025-02-19T20:32:04+5:302025-02-19T20:50:51+5:30
देशी कट्टा, वाघाच्या मिश्या केल्या जप्त

वाघ, बिबट्याच्या अवयवांची विक्री करणारे आरोपी जाळ्यात; गोंदियात तीन जणांना घेतलं ताब्यात
सडक अर्जुनी: वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सापळा रचून वाघ, बिबट्याची शिकार करून त्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना सडक अर्जुनी येथून ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (दि.१९) केली. आरोपींमध्ये विठ्ठल मंगरू सराटी (रा. दल्ली हल्दीटोला, सडक अर्जुनी), हरीश लक्ष्मण लांडगे (रा. मुंडीपार, सडक, ता. साकोली, जि. भंडारा), घनश्याम शामराव ब्राह्मणकर (रा. पिपरी राका, ता. सडक अर्जुनी) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार विभागीय वन अधिकारी दक्षता पी. जी. कोडापे, नागपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट्या वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी वनपरिक्षेत्रात सापळा रचला. तसेच बनावट ग्राहक तयार करून आरोपींसोबत बोलणी करून त्यांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील परिसरातून बुधवारी ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी येथे आणले. यातील आरोपी विठ्ठल मंगरू सराटी याची अंगझडती घेतली असता त्याच्यावजळ वाघ, बिबट्या यांच्या मिश्या २२ नग, खवले मांजराचे दाेन दात व एक देशी कट्टा पिस्तूल आढळले. तर आरोपी हरीश लांडगे, घनश्याम ब्राह्मणकर यांची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे काही आढळले नाही. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीची चौकशी केली असता तिन्ही आरोपी हे वाघ, बिबट्या वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांचे अवयव विक्री करण्याचे व्यवसाय करीत असल्याचे उघडकीस आले.
...........................
आरोपींना १९ फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी
ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३५ ,३९, ४४, ४८, (ए) ४९, बी ५०, ५१ गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही आरोपींना बुधवारी (दि.१९) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
...............
यांनी केली कारवाई
वन विभागीय वन अधिकारी नागपूर पी. जी. कोडापे, नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पवन जेफ, सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक रवी भगत, छबुकांता भडांगे यांनी केली.
...................
शिकाऱ्यांची टोळी सक्रिय
सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात लगत असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व वनविभागाच्या सडक अर्जुनी परिसरात घनदाट जंगल असल्याने वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांची तस्करी करणारेसुद्धा या परिसरात सक्रिय असल्याचे पुढे आले आहे.