मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात शस्त्र तस्करी करणाऱ्या आरोपीला भिवंडीतून अटक!
By जितेंद्र कालेकर | Published: February 27, 2024 07:38 PM2024-02-27T19:38:21+5:302024-02-27T19:38:57+5:30
गुन्हे शाखेची कारवाई: देशी बनावटीचे सात पिस्तुल, दहा काडतुसे हस्तगत
ठाणे : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रातील भिवंडीमध्ये शस्त्रांची तस्करी करणाऱ्या गुरुचरण छाबिलासिंग जुनेजा (२३, मू. पो. पाचोरी, ता. खकणार, जिल्हा बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. त्याच्याकडून देशी बनावटीचे सात पिस्तुले आणि दहा जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
एक जण नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणकोली नाका येथे पिस्तुल विक्री करण्यास येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटच्या पथकाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक धनराज केदार, उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी आदींच्या पथकाने २३ फेब्रुवारी २०२४ रोजी या भागात सापळा रचून गुरुचरण याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये देशी बनावटीची माऊजर पिस्तुल आणि काडतुसे आढळली.
याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि विक्री केल्याप्रकरणी त्याला अटक केली. त्याला २८ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश भिवंडी न्यायालयाने दिले आहेत.