चोरी करणाऱ्या आरोपीला लाखोंच्या मुद्देमालासह अटक, तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:17 PM2023-03-11T18:17:08+5:302023-03-11T18:17:59+5:30
मंगेश कराळे नालासोपारा :- तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपीला १५ तोळ्यांचे सोन्याच्या दागिन्यांसह अटक केले आहे. ...
मंगेश कराळे
नालासोपारा :- तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपीला १५ तोळ्यांचे सोन्याच्या दागिन्यांसह अटक केले आहे. पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला असून पोलीस गुन्ह्याचा पुढील तपास करत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी शुक्रवारी दिली आहे.
मोरेगाव येथील पिलाजी पाटील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुनीती वेप्सी रीडर (५१) या महिलेच्या घरी २८ फेब्रुवारीला दुपारी दीडच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाजा वाटे आत प्रवेश करत मोबाईल फोन, पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन, सोन्याच्या पट्ट्या, कानातील फुल, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे लॉकेट, मंगळसूत्र, नाकातील नथनी असा एकूण ४ लाख ८९ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. तुळींज पोलिसांनी चोरट्यां विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
नमुद गुन्हयाचे अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी करून त्यांच्या राहते घरी़ काम करणारा मुलगा उत्तम ज्ञानेश्वर खंदारे यास चौकशीकामी ताब्यात घेवुन त्याचेकडे दाखल गुन्ह्राचे अनुषंगाने विचारपुस केली असता तो असमाधानकारक तसेच दिशाभुल करणारी उत्तरे देत होता. तसेच पोलीसांच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्याकरीता उत्तमने फिनेल पिवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून तपास प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. तांत्रिक विश्लेषणाव्दारे उत्तम हा गुन्हा घडलेल्या दिवशी विधीसंघर्ष बालक याच्या वारंवार संपर्कात होता. आरोपी उत्तम व विधीसंघर्ष बालक यांच्याकडे तपास केला असता त्यांनी आपसात संगनमत करून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून नमुद गुन्हयात चोरी केलेले एकुण १५ तोळे १५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच १० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण ४ लाख ५८ हजार ५६० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी उत्तम ज्ञानेश्वर खंदारे याला ९ मार्चला अटक करुन विधीसंघर्ष बालकास भिवंडीच्या बाल न्याय मंडऴ येथे हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, आनंद मोरे, उमेश वरठा, आशपाक जमादार, तडवी, पन्हाळकर, पांडुरंग केंद्रे, छबरीबन, राऊत यांनी केली आहे.