चोरीचे दागिने विक्रीच्या प्रयत्नातील आरोपीला अटक, ९० हजारांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 08:48 PM2024-01-08T20:48:17+5:302024-01-08T20:48:27+5:30
पोलिसांनी आरोपीजवळील सोन्याची १५ ग्रॅम वजनाची एक पाटली (किंमत ९० हजार) जप्त केली.
लातूर : चोरलेले दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी शहरातील औसा रोड परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याजवळील ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्ह्यात घडणाऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी, अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास पोलिस पथकाला भरत इंद्रजित कदम (रा. पवारनगर, औसा) हा चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सदरील आरोपीस औसा रोड परिसरातून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, औशातील पवार नगरातील घरातून चोरी केल्याचे सांगितले. त्याप्रकरणी औसा पोलिसात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी आरोपीजवळील सोन्याची १५ ग्रॅम वजनाची एक पाटली (किंमत ९० हजार) जप्त केली. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस अंमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, चालक चंद्रकांत केंद्रे यांनी केली.