मित्राचा खून करून फरार आरोपीला हरियाणातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 05:34 PM2024-06-12T17:34:19+5:302024-06-12T17:34:55+5:30

१० मे रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावर सोपारा फाट्यावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता.

Accused on the run after murdering his friend arrested from Haryana | मित्राचा खून करून फरार आरोपीला हरियाणातून अटक

मित्राचा खून करून फरार आरोपीला हरियाणातून अटक

मंगेश कराळे

मित्राचा खून करून फरार झालेल्या आरोपीला हरियाणा राज्यातून पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे.

१० मे रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावर सोपारा फाट्यावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पोलिसांना मयत तरुणाच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यावर ‘एस्सेल’ असे नाव होते. तेवढ्या एका दुव्यावरून पोलिसांना मयताची ओळख पटवून हत्येचा तपास करायचा होता. पोलिसांनी त्या चिठ्ठीवरील ‘एस्सेल’ नावाचा गुगलवरून शोध घेतला. तेव्हा विविध संकेतस्थळांची नावे समोर आली. मानखुर्द येथील एका स्टुडियोचे एस्सेल नाव होते. या स्टुडियोतून सिनेमासाठी ज्युनिअर आर्टीस्ट पुरवले जात होते. पोलिसांनी त्याठिकाणी भेट देऊन तेथे येणार्‍या लोकांना चिठ्ठी दाखवून चौकशी केली. तेव्हा एका तरुणीने चिठ्ठीचे हस्ताक्षर संतोषकुमार यादव या तरुणाचे असल्याचे ओळखले. ७ मे पासून त्याचा फोन बंद होता व त्याचदिवशी त्याने तिला व्हिडियो कॉल केला होता तेव्हा त्याच्यासोबत सनी सिंग आणि राहुल पाल अशी दोन तरुण असल्याचे पोलिसांना सांगितले.

संतोषकुमार हा सिनेसृष्टीत मॉडेल पुरविण्याचे काम करत होता. त्याला या कामाचे एक मोठे कंत्राट मिळाले होते. त्यामुळे प्रतिस्पर्धी सनी सिंग आणि राहुल पाल यांनी संतापून त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. ७ मे रोजी दोघांनी संतोषकुमारला या कामाची पार्टी देण्यासाठी बोलावले. त्याला भरपूर मद्य पाजल्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर त्याचा मृतदेह महामार्गालगत सोपारा फाट्याजवळ टाकून दिला होता. पोलिसांनी १४ मे रोजी आरोपी सनी सिंगला अटक केली होती. तर फरार आरोपी राहुल पाल याची तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचा तांत्रिक शोध घेत असताना तो सेक्टर ५८, फरीदाबाद येथील जाजरू गावाच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन सापळा रचुन राहुलला (५०) ताब्यात घेऊन ७ जूनला अटक केली आहे. 

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (प्रशासक) शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, निखिल मंडलिक, संजय मासाळ, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, सुजय पाटील, अभिजित नेवारे, नामदेव ढोणे आणि सोहेल शेख यांच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या.

Web Title: Accused on the run after murdering his friend arrested from Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.