अँटीजन चाचणी करून परतताना आरोपी पसार; चारकोप पोलिसांकडून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 10:42 AM2021-07-01T10:42:47+5:302021-07-01T10:43:18+5:30
आरोपीचे एका १७ वर्षीय मुलीवर प्रेम होते. मात्र तिच्या घरच्यांना ही बाब मंजूर नव्हती. या दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानुसार त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली.
- गौरी टेंबकर - कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: अँटीजन चाचणी करून परतत असताना बलात्काराचा आरोप असलेला आरोपी पसार झाला. कांदिवलीत हा प्रकार घडला असुन याप्रकरणी चारकोप पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे.
अविनाश यादव (२१) असे या पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळलेल्या माहितीनुसार, यादवला २६ जून, २०२१ रोजी चारकोप पोलिसांनी अटक केली होती. त्याचे एका १७ वर्षीय मुलीवर प्रेम होते. मात्र तिच्या घरच्यांना ही बाब मंजूर नव्हती. या दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानुसार त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला अँटीजन चाचणी करण्यासाठी नेण्यात आले होते. तिथून परतत असताना कांदिवली सिग्नलला गाडी थांबली. त्याचा फायदा घेत पोलिसांना धक्का देत हातात असलेल्या हटकडी सोबत यादव पळाला. त्यानंतर लगेचच याबाबत चारकोप पोलिसानी सर्व पोलीस ठाण्यात याबाबत मेसेज पाठवला आणि त्याचा शोध सुरू आहे.