आरोपीची भूमिका रूम उपलब्ध करून देण्यापुरती; गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नाही!
By रतींद्र नाईक | Published: October 8, 2023 08:58 PM2023-10-08T20:58:52+5:302023-10-08T21:00:09+5:30
लॉज मॅनेजरला सत्र न्यायालयाकडून जामीन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लॉजच्या मॅनेजरला मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अर्जदाराची भूमिका जोडप्याला केवळ रूम उपलब्ध करून देण्याची होती प्रत्यक्ष गुन्ह्यात त्याचा सहभाग नाही असे स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयाने लॉज मॅनेजरचा जामीन अर्ज मंजूर केला.
मुंबईतील संगम लॉज आणि बोर्डिंग येथे काम करणाऱ्या लॉज मॅनेजरला पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली. मॅनेजरने पीडिता अल्पवयीन असतानाही मुख्य आरोपीला लॉज मधील रूम उपलब्ध करून दिला. या प्रकरणी जामीन मिळावा यासाठी आरोपीने मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला त्यावर न्यायाधीश एस सी जाधव यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. आपण कोणताही गुन्हा केला नाही तसेच पोलिसांना आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आरोपीने न्यायालयाला सांगितले आरोपीला अटक करण्यात आल्यापासून आरोपी तुरुंगात असून त्याला ताब्यात घेऊन कोणताही पुरेसा हेतू साध्य होणार नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने १५ हजाराच्या जात मुचलक्यावर आरोपीचा जामीन अटी शर्तीसह मंजूर केला.