९.६० लाखांच्या लुटमार प्रकरणातील आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 06:48 PM2019-06-06T18:48:39+5:302019-06-06T18:56:13+5:30
पोलीस तपासाला यश : महिन्याभरापूर्वी घडली होती घटना
वाशिम - शहरापासून जवळच असलेल्या चौपाल सागरच्या व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षकाचे दुचाकी वाहन अडवून त्यांना ९.६० लाखांनी लुटल्याप्रकरणी शुभम विठ्ठल जाधव, प्रतीक किसन सूर्य, विठ्ठल भगवान सूर्य, कृष्णा देशमुख (सर्व रा. काटा, ता. वाशिम) या चार आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले.
अकोला - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चौपाल सागरचे व्यवस्थापक दर्शन उमाकांत जोशी (वय ३५, रा.नालंदा नगर) आणि सुरक्षा रक्षक राजू हरिभाऊ इंगळे हे दोघे ६ मे २०१९ रोजी दुचाकी वाहनाने चौपाल सागर आणि पेट्रोल पंप व्यवसायाची जमा झाली ९ लाख ६० हजार ६२७ रूपयांची रक्कम बॅगमध्ये भरून एका खासगी बँकेत जमा करण्यासाठी जात होते. यादरम्यान अकोला नाक्यापासून थोड्याच अंतरावरील वाटाणे लॉननजिकच्या टी पॉइंटवर विना क्रमांकाच्या दुचाकीने दर्शन जोशी यांच्या वाहनास धडक दिली. तसेच दोन अज्ञात चोरट्यांनी चौपाल सागरचे व्यवस्थापक आणि सुरक्षा रक्षकास बेदम मारहाण करून त्यांच्याजवळ असलेली पैशाची बॅग पळविली होती. दरम्यान, या दिवसाढवळ्या घडलेल्या या गंभीर घटनेतील आरोपींचा छडा लावून त्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान वाशिम पोलिसांसमक्ष उभे ठाकले होते. त्यानुषंगाने गेल्या महिनाभरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक व शहर पोलीस स्टेशनमधील डी.बी.चे पथक यांनी चोख तपास करून काटा येथील चार आरोपींना गजाआड केले. त्यांच्याविरूद्ध वाशिम शहर पोलिसांत विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
या कार्यवाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बन्सोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, वाशिम पोलीस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते, सहायक पोलीस निरीक्षक मुकूंद वाघमोडे, डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे, प्रशांत अंभोरे, गणेश बरगे, ज्ञानदेव म्हात्रे, विजय पतंगे, रामकृष्ण नागरे, गोपाल घोडे, गजानन ब्राम्हणे आदिंनी सहभाग नोंदविला.