आरोपी अल्पवयीन मुलाच्या घरावर दगडफेक; येरवड्यातील खुनाच्या घटनेनंतरचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:29 PM2020-05-27T19:29:39+5:302020-05-27T19:30:15+5:30
खुनाच्या या गंभीर घटनेमुळे पंचशील नगर परिसरात काही काळ तणाव निर्माण
पुणे : येरवडा येथील पंचशीलनगरमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून प्रतिक वन्नाळे याचा खून करण्यात आला होता. त्याच्या अंत्यसंस्काराच्यावेळी जमलेल्यांपैकी काही जणांनी यातील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या घरावर दगडफेक करुन दरवाजा तोडण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी येरवडापोलिसांनी बेकायदा जमाव जमवून दंगल माजविल्याचा ६ ते ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रतिक हनुमंत वन्नाळे (वय २७) यांचा सोमवारी दुपारी आरोपींबरोबर किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्याच रागातून सोमवारी रात्री ९ वाजण्याच्यासुमारास आरोपींनी प्रतिकला घरातून बोलावून कॉमर्स झोनसमोरील मोकळ्या मैदानात नेऊन कुर्हाड व दगडाने मारहाण करुन त्याचा खुन केला होता.याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चार जणांना अटक केली असून चार अल्पवयीनमुलांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी शवविच्छेदनानंतर प्रतिकचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे हवाली केला. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याचा मृतदेह पंचशीलनगर येथे आणण्यात आला होता. खुनाच्या या गंभीर घटनेमुळे मंगळवारी सकाळपासूनच पंचशील नगर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी चिडलेल्या काही जणांनी प्रतिक याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या मुंजाबा वस्तीतील गल्लीत अल्पवयीन मुलाच्या घरावर हल्ला केला. पत्र्याच्या घरावर दगडफेक केली. घराचा दरवाजा तोडून आतील सामानाची नासधुस केली.
याप्रकरणी पोलीस शिपाई अजित मगदुम यांनी फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिसांनी बेकायदा जमाव जमवून दंगल माजविल्याचा गुन्हा दाखल केला आहे.