तडीपार गुंडाची वाकड भागात 'मुळशी पॅटर्न' फेम वरात; पोलिसांवर नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 08:36 PM2020-05-27T20:36:47+5:302020-05-27T20:44:49+5:30
पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी होता तडीपार
वाकड : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार असूनही या कारवाईचा भंग करून वाकड भागात दादागिरी व दहशत करणारा सराईत गुंड संदीप उर्फ बाळ्या भोसले याला वाकड पोलिसांच्या तपास पथकाने शिताफीने पकडून त्याची परिसरातून धिंड काढली. त्याला आसरा देणाऱ्या घरमालकांनाही कडक समज देण्यात आला या कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
संदीप उर्फ बाळ्या भोसले (वय २८, रा.काळाखडक) याच्या विरुद्ध वाकड हिंजवडी हद्दीत बॉडी ऑफेन्सचे गंभीर पाचपेक्षा जास्त गुन्हे असून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची स्थापना होताच २०१८ साली वाकड पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते तरीही बाळ्या लपून छपून काळाखडक भागात येऊन दहशत निर्माण करत असल्याबाबत वाकड पोलिसांत काही नागरिकांनी तक्रारी दिल्या होत्या तर बाळ्या याने नुकतेच पहिल्या पत्नीला फसवून दुसरे लग्न केल्याने तिनेही वाकड ठाणे गाठून गाऱ्हाणे मांडले होते.
वाकड ठाण्याचे तपास पथक प्रमुख हरीश माने व त्यांचे पथक बाळाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते त्यातच बाळ्या बुधवारी (दि २७) सायंकाळी ५ वाजता काळा खडक येथे आल्याची खबर हरीश माने यांना मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन गरीबांचा कर्दनकाळ बनलेल्या बाळ्याची वरात काढून त्याच्यावर कारवाई करण्यात आली, त्याला मदत करणाऱ्या आणि आसरा देणाऱ्या लोकांनाही सक्त ताकीद देण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक डॉ विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरीश माने, पोलीस नाईक बापू धुमाळ, विक्रम जगदाळे, विक्रम कुदळ, सुरज सुतार, नितीन गेंजगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.