पोलिसांच्या हातावर तुरी देत रुग्णालयातून पलायन करणारा आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:16 PM2020-05-27T17:16:27+5:302020-05-27T17:17:24+5:30
वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते रुग्णालयात
पिंपरी : रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या तीन आरोपींपैकी एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. त्याला मंगळवारी रात्री मोशी येथून जेरबंद करण्यात आले. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.
कृष्णा उत्तम सोनवणे (वय १९, रा. तापकीर मळा, चर्च समोर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. आकाश बाबुलाल पवार (वय २१) व गणेश उर्फ अजय दत्तात्रय कांबळे (वय १९, दोघेही रा. नढेनगर, काळेवाडी) अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याप्रकरणी आरोपी यांना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी आणले होते. त्यावेळी आरोपी यांनी गोंधळ घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन आरोपीना पोलिसांनी जागीच जेरबंद केले. तर आरोपी कृष्णा सोनवणे पळून गेला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. एस. मुदळ यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान आरोपी रुग्णालयातून पळून गेल्यानंतर मोशी येथे गेला. तेथे त्याच्या ओळखीच्या काही जणांकडून पैसे घेऊन बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत होता. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील कर्मचारी गणेश सावंत यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून आरोपी कृष्णा सोनवणे याला जेरबंद करण्यात आले.
गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, कर्मचारी सचिन उगले, विजय मोरे, गणेश सावंत, विशाल भोईर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.