राजगुरुनगर येथील कारागृहातून पळालेल्या आरोपीची अहमदनगर जिल्हयात हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 12:50 PM2018-11-22T12:50:39+5:302018-11-22T12:51:31+5:30
गावातील जुन्या भांडणावरून आरोपीचा गावातील काही लोकांबरोबर वाद झाला. वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.
राजगुरूनगर: खून, मारहाण, दरोडे अशा गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी मागील महिन्यात राजगुरुनगर कारागृहातून फरार झाला होता. या आरोपीची अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खंडाळा येथे बुधवारी रात्री हत्या करण्यात आली आहे.जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गोयकर असे हत्या झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा येथे राहणाऱ्या गोयकरवर नगरसह पुणे जिल्ह्यात शेकडो गुन्हे दाखल होते. खून, मारहाण, दरोडे अशा गंभीर स्वरुपाचे ते गुन्हे होते. मागील महिन्यात तो राजगुरुनगर येथील कारागृहातून फरार झाला होता. बुधवारी रात्री १० वाजता गावातील जुन्या भांडणावरून राहुलचा गावातील काही लोकांबरोबर वाद झाला. वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. यात काही जणांनी त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. डोके, गळा आणि गुप्तांगावर जबर मारहाण करून तसेच डोके ठेचून हत्या करण्यात आली, असे समजते. राहुलची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह राहुलचा असल्याची खात्री केली. या हत्येप्रकरणी भाऊसाहेब बबन खंडेकर, बबन किसन खंडेकर, हौसराव गोयकर, संतोष गोयकर, राजेंद्र चौधरी, आणि तीन महिलांसह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित जणांचा तपास केला जात आहे